नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील अस्तंभा येथे मुलाला मारहाण करणार्या पतीला मज्जाव केल्याने याचा राग आल्याने पतीने बेदम मारहाण केल्याने उपचारादरम्यान २३ वर्षीय पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी धडगांव पोलीसात पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील अस्तंभा येथील रुपसिंग पारशी वळवी हा १७ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्याच्या तीन वर्षीय मुलगा आयुश याला मारहाण करीत होता.
यावेळी रुपसिंग वळवी यांची पत्नी सुमित्रा रुपसिंग वळवी (वय २३ ) यांनी पतीला मारहाण करु नका असे सांगत मुलाला सोडविण्यासाठी गेली. याचा राग आल्याने रुपसिंग वळवी याने पत्नी सुमित्रा यांना हाताबुक्यांनी मानेवर, हातावर, छातीवर व पोटावर बेदम मारहाण करुन गंभीर दुखापत केले. सुमित्रा रुपसिंग वळवी यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरु असतांनाच सुमित्रा वळवी यांचा मृत्यू झाला.
याबाबत जलसिंग हिरालाल पाडवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात रुपसिंग वळवी याच्याविरोधात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रविण महाले करीत आहेत.








