नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासींचे श्रद्धास्थान एकलव्य यांची तसेच आदिवासी स्वातंत्र्य सेनानी वीर बिरसा मुंडा यांची मूर्ती भेट देऊन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत आणि सत्कार केला.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जिल्हा मेळाव्यासाठी प्रथमच शनिवार नंदुरबार दौऱ्यावर आले होते. दुपारी मेळावा संपल्यानंतर त्यांनी भाजपाचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी भेट दिली.
त्या प्रसंगी डॉक्टर गावित परिवाराने आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासींचे श्रद्धास्थान एकलव्य यांच्या आकर्षक मूर्तीची अनोखी भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे महाराष्ट्रात सर्वत्र दौरे करीत आहेत तथापि आदिवासींच्या अस्मिता जागविणाऱ्या या वीर पुरुषांची मूर्ती त्यांना भेट देण्याचा हा प्रसंग प्रथमच घडला. आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी मुख्यमंत्री यांना ही भेट दिली. तर उपस्थित अन्य मान्यवरांना आदिवासी स्वातंत्र्य सेनानी वीर बिरसा मुंडा यांच्या आकर्षक मूर्तीं भेट देण्यात आली.
त्याप्रसंगी मंत्री दादा भुसे, मंत्री अब्दुल सत्तार,खासदार राजेंद्र गावित, आमदार चुडामण, पाटील,, धुळ्याचे महापौर प्रदीप करपे, आमदार मंजुळा गावित, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
एकलव्य यांचा महाभारतात महत्त्वपूर्ण उल्लेख असून आदिवासी समूहांचे ते प्रेरणास्थान म्हटले जातात. जळगाव धुळे नाशिक जिल्ह्यातील गावागावात त्यांचे फलक प्रतिमा पूजन करून आदिवासी लोक त्यांच्याविषयी श्रद्धा जोपासतात. हे लक्षात घेता एकलव्य यांची मूर्ती मुख्यमंत्र्यांना भेट देण्याला निराळे महत्त्व आहे.
त्याचप्रमाणे वीर बिरसा मुंडा हे देखील ब्रिटिश राजवटी विरोधात लढलेल्या महान स्वातंत्र्यसेनानींपैकी एक गणले जातात. वीर बिरसा मुंडा हे झारखंड राज्यातून पुढे आले आदिवासी समूहाला अन्यायाविरोधात उभे करणे रूढी परंपराच्या जोखडातून त्यांना मुक्त करणे यासारखे भव्य कार्य त्यांनी जीवनभर केले म्हणून वीर बिरसा मुंडा यांना आदिवासी समूह दैवत मानतो. अशा या दोन महान व्यक्तींच्या प्रतिमा मुख्यमंत्री यांना भेट देऊन डॉक्टर गावित परिवाराने आदिवासी समूहाचे अनोख्या पद्धतीने प्रतिनिधित्व केले.








