नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून धडाडीचे आणि जलदगतीने निर्णय घेण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्याचाच प्रत्यय आज आकांक्षीत आणि आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या नंदुरबार दौऱ्यानिमित्त पुन्हा एकदा आला.नंदुरबार शहरातील रिंग रोड, नवापूर येथील औद्योगिक वसाहतीतील १३२ केव्ही वीज उपकेंद्रासाठी जागा आणि नंदुरबार नगरपालिकेच्या थकबाकीच्या विषयावर तात्काळ निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी गतिमान प्रशासनाचा अनुभव नंदुरबारकरांना दिला.
मुख्यमंत्री श्री. शिंदे आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते 15 कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदुरबार शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी रिंग रोड आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख करीत पालकमंत्री डॉ. गावित यांच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
याच कार्यक्रमात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार नगरपालिकेचा सात कोटी 28 लाख रुपयांचा निधी नगरविकास खात्याकडे थकीत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. या गोष्टीचीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तातडीने दखल घेऊन
श्री. रघुवंशी यांचे भाषण सुरू असतानाच नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करीत नंदुरबार नगरपालिकेची थकीत रक्कम तात्काळ अदा करण्याचे निर्देश दिले. तर मुख्यमंत्री यांचे भाषण सुरू असतानाच नगरविकास विभागाने यास मंजुरी दिल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले व सायंकाळी थकीत रक्कम अदा करण्यासाठी थेट शासन आदेशच निर्गमित केला.
नंदुरबार जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना मिळावी, त्यातून रोजगार निर्मिती व्हावी म्हणून नवापूर येथे औद्योगिक वसाहत कार्यान्वित करण्यात आली आहे. या वसाहतीसाठी वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रासाठी औद्योगिक वसाहतीत जागा आवश्यक असल्याची बाब जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत मुख्यमंत्री आपला नंदुरबार दौरा आटोपून हेलिपॅडवर आले असता त्यांनी स्वतःहून जिल्हाधिकारी यांना सांगितले की, याबाबत
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क झाला असून वीज उपकेंद्राच्या जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत उद्योग मंत्री लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले. तसेच आजच्या सभेत मागणी केलेल्या जलसिंचनासह इतर प्रश्नांवरही लवकरच निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एकूणच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा नंदुरबार दौरा जिल्ह्यासाठी फलदायी मानला जात असून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गतिमान कारभाराचा अनुभव आज नंदुरबारकरांनी घेतला आहे.








