नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नंदूरबार पालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी नंदुरबार दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात थोडा बदल झाला असून हेलिपॅड मैदानावरून मुख्यमंत्री नगरपरिषदेच्या इमारतीच्या उद्घाटनाला जाणार होते मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिपॅडवरून थेट राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा ना.डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी जातील. त्यानंतर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला जाणार आहेत.
मुख्यमंत्री हे पूर्वीच्या दौऱ्यानुसार हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर मानवंदना व स्वागत झाल्यावर थेट अकरा वाजेला मोटारीने नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला येणार होते. परंतु आता या दौऱ्यात काहीसा बदल झाला असून मुख्यमंत्री हे नंदुरबार येथे हेलिपॅड वर आगमन झाल्यावर मानवंदना व सत्कार झाल्यानंतर नगर परिषदेच्या कार्यक्रमाला न जाता ते सुरुवातीला राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.
नव्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतील वर्षा शासकीय निवासस्थान सकाळी 8.15 वाजता येथून मोटारीने मुंबई विमानतळ तेथून विमानाने नाशिककडे रवाना होतील. नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील विमानतळावर सकाळी 9.25 वाजता मुख्यमंत्र्यांचे आगमन होईल. ओझर येथून मुख्यमंत्री हे 9.25 वाजता हेलिकॉप्टरने नंदुरबारकडे प्रयाण करतील. तसेच नंदुरबार येथील हेलीपॅडवर सकाळी 10 वाजता मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे. 10:45 वाजता नंदुरबार पोलीस कवायत मैदानावर मानवंदना व स्वागत कार्यक्रम होईल. त्यानंतर मुख्यमंत्री सकाळी 10.55 वाजता हेलिपॅड वरून मोटारीने राज्याचे आदिवासी विकास मंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण करतील.
तसेच सकाळी 11 वाजेपर्यंत पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव आहे. त्यानंतर सकाळी 11.10 वाजेला मुख्यमंत्री हे नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारत उद्घाटन सोहळ्यासाठी पोहोचतील. साडेअकरा वाजे दरम्यान मोटारीने नाट्य मंदिरातील कार्यक्रमास उपस्थिती, 11:40 वाजे दरम्यान मानपत्र व सत्कार कार्यक्रम तसेच दुपारी 12 वाजे दरम्यान माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या फार्म हाऊस कडे प्रयाण करून त्या ठिकाणी राखीव तर दुपारी 1.30 वाजे दरम्यान जी. टी.पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेला उपस्थिती राहणार आहे.
दुपारी तीन वाजेला सभा झाल्यानंतर मोटारीने 3.15 वाजेपर्यंत हेलिकॉप्टरने ओझर कडे प्रयाण करतील आणि 4.20 वाजेला ओझर येथून मुंबईकडे विमानाने जातील
मुख्यमंत्र्यांचा अचानक दौऱ्यातील या बदलामुळे हा विषय राजकीय दृष्ट्या उत्सुकतेचा ठरला आहे.
असा सुधारित दौरा मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून हा दौरा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील उपनिवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खाते यांनी जाहीर केला आहे.








