नंदुरबार l
शहरातील बसस्थानकात व शहादा बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या दोघा महिलांच्या पर्सची चैन उघडून दोघा महिलांच्या पर्समधून सुमारे दोन लाख रुपयांचे दागिने व रोकड चोरुन नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा येथील नुतन दिनकर मिस्तरी या नंदुरबार बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना अज्ञातांनी त्यांच्या पर्सची चैन उघडून त्यातील ४० हजार रुपये किंमतीचे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र पोत व अडीच हजार रुपयांची रोकड असा सुमारे ४२ हजार रुपये ५०० रुपये किंमतीचे ऐवज लंपास केला. याबाबत नुतन मिस्तरी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोना.श्रीकांत माळी करीत आहेत.
तसेच शहादा तालुक्यातील मंदाणा येथील संदिप दगडू साळुंखे यांची पत्नी हर्षदा या अमळनेर येथे जाण्यासाठी शहादा बसस्थानक येथून शहादा-जळगाव बसमध्ये चढत असतांना अज्ञाताने त्यांच्या पर्सची चैन उघडून त्यात असलेला सोन्याचे दागिने असलेला बॉक्स चोरुन नेला. सदर बॉक्समध्ये ८४ हजार रुपये किंमतीचे २८ ग्रॅम वजनाची एक सोन्याची मंगलपोत, ४८ हजार रुपये किंमतीचे १६ ग्रॅम वजनाची एक मंगलपोत व २८ हजार ५०० रुपये किंमतीचे ५ ग्रॅम ३ ग्रॅम वजनाचे कानातले टोंगलची जोडी व दीड ग्रॅम वजनाची किल्लूची जोडी असे एकूण १ लाख ६० हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने होते. याबाबत संदिप साळुंखे यांनी शहादा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








