शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयास नॅक समितीने ए ग्रेड दिली आहे. ए दर्जा प्राप्त करणारे औषधनिर्माण शास्त्र शाखेतील जिल्ह्यातील हे एकमेव महाविद्यालय ठरले असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षेत्रात 3.15 सीजीपीए प्राप्त करणारे म्हणूनही महाविद्यालयाने बहुमान प्राप्त केला आहे.
शिक्षण महर्षी स्वर्गीय अण्णासाहेब पी.के. पाटील संस्थापक असलेल्या पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाची सन 1994 ला स्थापना करण्यात आली आहे.महाविद्यालयास नवी दिल्ली येथील एआयसीटी संस्थेच्या नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडेशनने (एनबीए) यापूर्वीच मान्यता दिली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडूनही महाविद्यालयास अ दर्जा प्राप्त झाला आहे.
प्राचार्य डॉ.एस.पी.पवार आणि मंडळाचे शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाने नॅकला सामोरे जाणाऱ्या शहादा औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयास 3.15 सीजीपीएसह ए ग्रेड प्राप्त झाली आहे. दि. 20 व 21 ऑक्टोबर या कालावधीत आर.के.विद्यापीठ राजकोट (गुजरात)चे कुलगुरू डॉ. तुषार देसाई यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने भेट देऊन पाहणी केली. या समितीत डॉ. हरीश दुरेजा (रोहतक,हरियाणा) व डॉ.विशाल कुमार गुप्ता (म्हैसूर,कर्नाटक) यांचा समावेश होता. त्यांनी महाविद्यालयाच्या सर्व विभागांसह प्रयोगशाळांची तपासणी केली.शैक्षणिक व अनुषंगिक सर्व बाबींची पाहणी केली. संशोधनासह विद्यार्थी विकासाबाबत महाविद्यालयाने राबविलेल्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली. महाविद्यालयातील प्रयोगशाळा, ग्रंथालय, जिमखाना, क्रीडांगण, वस्तीगृह तसेच महाविद्यालयाने वेळोवेळी घेतलेल्या चर्चासत्र,कार्यशाळा आदींबाबत माहिती जाणून घेतली.
समितीने मंडळाचे व्यवस्थापन मंडळ, माजी विद्यार्थी संघ,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमासही समितीने उपस्थिती दिली. महाविद्यालयाने राबविलेले उपक्रम व सोयी सुविधांची पाहणी करून समितीने नॅककडे अहवाल सादर केल्यानंतर शहादा औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयास 3.15 सीजीपीएसह एक ग्रेड प्राप्त झाल्याचे पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.पवार यांनी दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील औषधनिर्माण शास्त्र शाखेतून नॅकला सामोरे जात ए दर्जा प्राप्त करणारे हे महाविद्यालय कबचौ उमवि कार्यक्षेत्रातील 3.15 सीजीपीए प्राप्त करणारे एकमेव महाविद्यालय ठरले असून मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, व्यवस्थापन मंडळ, विविध शाखांचे प्राचार्य आदींनी अभिनंदन केले आहे.
![](https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2022/10/IMG-20221027-WA0029-205x300.jpg)
सर्व प्रकारचे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण सातपुड्याच्या पायथ्याशी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थापक स्वर्गीय अण्णासाहेब पी.के. पाटील यांनी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाची सुमारे पन्नास वर्षांपूर्वी स्थापना केली आहे. परिसरातील आदिवासी,दलित, बहुजन, शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांना सकस व रोजगारक्षम शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी संस्थचे सर्व सहकारी व विद्याशाखांचे प्रशासन तत्पर असते. औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाची गुणवत्तापूर्ण घोडदौड सुरू असून विद्यार्थी हितास प्राधान्य देत सर्वच विद्याशाखांचा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी यापुढेही सांघिक प्रयत्न सुरूच राहतील.दीपक पाटील,अध्यक्ष, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ,शहादा जिल्हा नंदुरबार.