नवापूर | प्रतिनिधी
तालुक्यातील चरणमाळ घाटात तीव्र उतारावर तांदूळ घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने अपघात झाला. यात ट्रकचालक जखमी झाला आहे.
महाराष्ट्र गुजरात राज्याची सीमेलगत धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीतील नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. तीव्र उतराच्या घाट रस्त्यातून तांदळांनी भरलेल्या ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला आहे. तीव्र उतारावरून खाली येत असताना ट्रक थेट कठडे तोडून दरीत जाता जाता वाचला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे. स्थानिक बोरझर व चरणमाळ येथील नागरिकांनी चालकाला 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी नवापूर पोलीस दाखल झाले आहेत.
अपघातग्रस्त ट्रक आंध्रप्रदेशमधून गुजरात राज्यात तांदूळ घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. एकूणच तीव्र उताराचा व वळणाच्या चरणमाळ घाट रस्त्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कठडे दुरुस्तीसाठी केलेली पाहणी केवळ पाहणीच राहिली आहे. अद्यापही या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुरुस्ती झाली नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे.