नंदूरबार l प्रतिनिधी
विसरवाडी येथील सार्वजनिक कला आणि वाणिज्य महाविद्यालय विसरवाडीच्या क्रीडा विभागातर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत अंतर विभागीय खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या वेळची अंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धा दिवंगत लोकनेते माणिकरावजी गावित यांच्या स्मृती प्रित्यार्थ आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटक म्हणून विसरवाडी एज्युकेशन सोसयटीचे संचालक भरत गावित आणि अध्यक्ष म्हणून विसरवाडी एज्यूकेशन सोसायटीचे संचालक धनंजय भरत गावित उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी विभागातील एकूण 11 संघ सहभागी झाले होते त्यामध्ये शहादा, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नंदुरबार, नवापूर, साक्री, दहिवेल, निजामपूर, म्हसदी व विसरवाडी या ठिकाणचे मुलांचे संघ सहभागी झाले होते. यावेळी खेळाडूंना डॉ. विजय पाटील व धनंजय गावित यांनी मार्गदर्शन केले.
कोरोना काळातील गेल्या दोन वर्षानंतर प्रथमच खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याने खेळाडू व दर्शकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. दोन मैदानांवर अकरा संघाचे सामने पार पडले. अंतिम फेरीमध्ये स्थानिक विसरवाडी महाविद्यालयाचा संघ व वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा या संघामध्ये चुरशीची लढत झाली.
नंदुरबार अंतर महाविद्यालयांमध्ये गेल्या तीन वेळी चॅम्पियन राहिलेला विसरवाडीचा संघ यंदाही अंतिम फेरीत एक डाव व 14 गुण मिळवून विजयी झाला. मान्यवरांच्या हस्ते विजय संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात सर्वसामाने पार पडले. सामन्यांसाठी प्रमुख पंच अनिल रौंदळ, हरीश पाटील, कुमार वळवी, करण चव्हाण यांनी पंचांचे भूमिका निभावली तर विशाल सोनवणे गूण लेखकाची भूमिका पार पाडली.
सदर प्रसंगी विसरवाडी गावातील सरपंच बकाराम गावित, सदस्य सुरेश गावित यांचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते जयेश अग्रवाल आणि संदीप अग्रवाल, डॉ. विजय पाटील, जयसिंग गावित, विविध महाविद्यालयाचे क्रीडा संचालक उपस्थित होते. जयेश अग्रवाल यांचे तर्फे खेळाडू व संघव्यवस्थापकांसाठी मध्यान भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्राचार्य बी. व्ही. गावित, डॉ. राहुल ठाकूर, किसन वसावे, संजय गावित, शरद चौधरी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नंदलाल अहिरराव, विष्णू गावित, संजय साळवे आणि महाविद्यालयांच्या खेळाडूंचे महत्त्वाचे योगदान लाभले. त्यासोबत ग्रंथपाल अजित हिरकने, प्रा. संतोष धनेधर, डॉ. विशाल करपे, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते








