नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापतीपदी रायसिंगपूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य शंकर आमश्या पाडवी यांची निवड झाल्याने आज अक्कलकुवा शहरात मोठा जल्लोष करण्यात आला.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभापती निवडी साठी आज नंदुरबार जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात विशेष सभा संपन्न झाली.यात अक्कलकुवा तालुक्यातील रायसिंगपूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य व विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांचे सुपुत्र शंकर पाडवी यांची आज समाज कल्याण सभापती पदी बिनविरोध निवड झाली.
निवडीनंतर अक्कलकुवा शहरात शंकर पाडवी यांचे आगमन झाले.यावेळी फाट्याजवळ त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. बँडच्या तालावर शेकडो कार्यकर्त्यांनी बेधुंद होत वाजत गाजत नाचत फटाक्यांच्या आतिषबाजीत वाहनातून भव्य मिरवणूक काढली.
यावेळी विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. आमलीबारी फाट्यापासून निघालेली मिरवणुकीची सांगता कालिका देवीच्या मंदिराजवळ करण्यात आली तेथून नवनिर्वाचित सभापती शंकर पाडवी हे आपले मुळगाव कोयलीविहीर कडे रवाना झाले.








