नंदुरबार l
शासनाच्या राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी प्रथमच नंदुरबार जिल्ह्याचा संघ सहभागी होत आहे. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राज्य बालनाट्य स्पर्धेत आपली अभिनयाची चुणूक दाखवण्याची संधी मिळणार आहे. यासाठी आज दि.२२ ऑक्टोबर रोजी नंदुरबार येथे बालकलावंतांची निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बालरंगभूमी परिषद जिल्हा शाखेचे प्रमुख कार्यवाह नागसेन पेंढारकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी राज्य बालनाट्य स्पर्धा घेण्यात येते. ही स्पर्धा महाराष्ट्रातील विविध दहा केंद्रांवर प्राथमिक स्वरूपात झाल्यानंतर अंतिम फेरी होते. मागील उन्हाळ्याच्या सुट्टीत नंदुरबार येथे बालरंगभूमी परिषद नंदुरबार शाखा व गाडगे बाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवसीय बालनाट्य शिबिराचे आयोजन केले होते आणि एक बालनाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी सलग पाच बालनाट्य सादर करण्यात आली होती.
जिल्ह्यातील नाट्य चळवळीला एक वेगळी दिशा देण्याचे कार्य येथील रंगकर्मी करत आहे. शालेय विद्यार्थ्यांना मोठा रंगमंच मिळावा या उद्देशाने शासनाच्या या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवण्यात आले आहे आणि यासाठी बालकलावंताची निवड चाचणी दि.२२ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता नंदुरबार येथील अंबिका कॉलनी, जाणता राजा चौक येथील सामाजिक सभागृहात होणार आहे. या निवड चाचणी करता मुबईचे नाट्य लेखक दिग्दर्शक आसेफ शेख अन्सारी हे स्वतः उपस्थित राहणार आहेत .
ज्या पालकांना आपल्या पाल्यांना शासनाच्या राज्य बालनाट्य स्पर्धेत सहभागी करून घ्यायचे आहे त्यांनी निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर (९९२३१२९७८२), मनोज सोनार (९०४९७७३१६७), राहुल खेडकर (९४२३३२७७११), राजेश जाधव (९९२२०३३५११), तुषार ठाकरे, तुषार सांगोरे, संतोष पाटील, आशिष खैरनार, चिदानंद तांबोळी आदींनी केले आहे.








