नंदुरबार l प्रतिनिधी
येथील जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेले समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन आज वरिष्ठांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सोपवलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याच्या सूचना आंदोलनकर्त्यांनी मान्य केल्यानंतर या अधिकाऱ्यांचे वेतन वेळेवर अदा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून थकीत असलेले वेतन तात्काळ अदा करण्यात यावे व पुढील कालावधीतील वेतन नियमित अदा करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इमारती समोर धरणे आंदोलन पुकारले होते.
काल दिनांक 17 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड पार पडली. जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून डॉ. सुप्रिया गावित व उपाध्यक्ष म्हणून सुहास नाईक यांनी पदभार स्वीकारला. 11 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या या आंदोलनाची आज जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून डॉ. सुप्रिया गावित व उपाध्यक्ष म्हणून सुहास नाईक यांनी तात्काळ दखल घेऊन त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
त्यानुसार जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, जिल्हा समुदाय आरोग्य योजनेचे नोडल अधिकारी डॉ. एच. टी. कोकणी व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली. सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या जागी 15 मानकांनुसार नियमित काम करणे अपेक्षित असून, अनेक अधिकारी ही कामे वेळेवर पूर्ण करत नसल्यामुळे वेतन अदा करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
आपणास नेमून दिलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार धामणे, उपाध्यक्ष डॉ. मृणालिनी जाधव, डॉ. संदीप काकुस्ते, डॉ. तुषार वसावे, डॉ. छाया वसावे, डॉ. रेखा नाईक यांच्यासह उपस्थित शिष्टमंडळाने दिले. जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या आठवड्यातच या सर्व आरोग्य अधिकाऱ्यांचे माहे ऑगस्ट 2022 पर्यंतचे वेतन अदा केले असून त्यांना दिलेल्या पंधरा इंडिकेटरनुसार कामे नियमित पूर्ण केल्यास पुढील महिन्यापासून त्यांना नियमित वेतन अदा करण्यात येईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. योजनेचे नोडल अधिकारी डॉ. एच. टी. कोकणी यांनी योजनेबाबतची संपूर्ण माहिती यावेळी उपस्थित अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिली.
मागण्यांबाबत प्रशासनाकडून समाधानकारक तोडगा निघाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्यासह अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी जाऊन आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेची माहिती देऊन सर्व कामे नियमित पूर्ण करण्याच्या तसेच, जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनावर यशस्वी तोडगा काढण्यात आला, त्याबद्दल समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेकडून सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.








