नंदुरबार | प्रतिनिधी
राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी जिल्ह्यातील गुन्ह्यांचा व पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे समस्यांचा आढावा घेतला. महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर हे १७ ते १९ पर्यंत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले आहेत.

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेला राजमुद्रा स्तंभ, भारतीय राष्ट्रध्वज व महाराष्ट्र पोलीस यांचा संयुक्तीक ध्वजाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, त्यानंतर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या प्रशासकीय तसेच वैयक्तीक अडीअडचणी यांचे निराकरण करण्यासाठी पोलीस दरबार घेण्यात आला. स्वागतपर भाषणात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांचा परिचय देवून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनंक पैलूंचा उलगडा केला.
पोलीस दरबारमध्ये पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मांडलेल्या समस्यांचे महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी तात्काळ निरसन केले. तसेच ज्या समस्या वरिष्ठ पातळीवरच्या होत्या, त्या निश्चितच सोडविण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस मुख्यालय येथे नेमणूकीस असलेले पोलीस हवालदार विरसिंग बापू वळवी यांचे १० सप्टेंबर २०२२ रोजी व अपर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नेमणूकीस असलेले सहा. पोलीस उप निरीक्षक देविदास वनसिंग तडवी यांचे ८ सप्टेंबर २०२२ रोजी दुर्देवी निधन झाले होते.
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मयत पोलीस अंमलदारांच्या कुटुंबासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलास स्वेच्छेने मदत करण्याचे आवाहन केले होते. पोलीस अधीक्षकांच्या आवाहनास जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून पोलीस हवालदार विरसिंग बापू वळवी यांचे परिवाराकरीता २ लाख ३ हजार ४ रुपये व सहा. पोलीस उप निरीक्षक देविदास वनसिंग तडवी यांचे परिवाराकरीता २ लाख ३३ हजार ४ रुपये एवढा मदत निधी अल्प काळात जमा करण्यात आला होता.
पोलीस दलाकडून जमा करण्यात आलेल्या मदत निधीचा धनादेश मयत पोलीस अंमलदार यांचे कुटुंबीयांना महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
आपले दैनंदिन कर्तव्य बजावित असतांना सर्व सामान्य जनतेचे लक्ष पोलीसांकडे असते, पोलीसाची प्रत्येक कृती ही समाजावर परिणामकारक असते त्यामुळे जनतेमध्ये काम करीत असतांना पोलीसांची वर्तवणूक नेहमी आदर्श व शिस्तप्रिय असावी. पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी आपले वैयक्तीक आयुष्यात चांगले आचार, विचार तसेच आहार, विहार या चतुःसूत्रीचा अवलंब करावा. पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपले कर्तव्य पार पाडावे. तसेच दैनंदिन कर्तव्य पार पाडून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. उपलब्ध असलेल्या वेळेपैकी जास्तीत जास्त वेळ कुटुंबाला द्यावा. पोलीस पाल्य यांच्यात इतर सर्वसामान्य मुलांएवढ्याच क्षमता असून त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाले तर, ते चांगली शैक्षणिक प्रग्रती करु शकतील. त्याकरीता आपण स्वतः सजग असणे आवश्यक आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
त्यानंतर अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी पोलीस मुख्यालयातील सर्व शाखांची पाहणी केली. त्यामध्ये जिल्हा नियंत्रण कक्ष, डायल-११२, जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल, महिला सेल, शस्त्रागार, बी.डी.डी.एस.श्वान पथक, मोटार परिवहन विभाग, सबसिडरी कँटीन यांची पाहणी करुन त्यातील प्रत्येक घटकांची सखोल माहिती घेतली. तसेच प्रत्येक घटकास योग्य त्या सुचना देवून ते करीत असलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
त्यानंतर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेकडून जिल्ह्याचा गुन्हे आढावा घेतला. मालमत्तेचे गुन्हे तातडीने उघडकीस आणून त्यात जास्तीत जास्त मुद्देमाल हस्तगत करणेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच पोलीस अधीक्षक तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दल करीत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवून जिल्हा पोलीस दलाचे कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, पोलीस उप अधीक्षक विश्वास वळवी, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक आत्माराम प्रधान, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शोखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांचेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व शाखा प्रभारी अधिकारी उपस्थित होते.








