शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे वरिष्ठ महाविद्यालय मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिवसानिमित्त ‘वाचाल तर वाचाल’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
वरिष्ठ महाविद्यालयातील केंद्रीय ग्रंथालयात ‘वाचाल तर वाचाल’ या विषयावर व्याख्यानासाठी वसंतराव नाईक महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.एच.एस. पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एस. पाटील होते. प्रारंभी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर प्रमुख वक्ते प्रा.डाॅ. पाटील यांनी विविध क्षेत्रातील लेखकांचा दाखला देत वाचनाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, आजची तरुणाई मोबाईलच्या आहारी चालली आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर वाचनाचे व्यसन लावणे आवश्यक आहे.
प्राचार्य डॉ. पाटील यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचनही करावे असे प्रतिपादन केले.यावेळी उपप्राचार्य डॉ.एम.के.पटेल, डॉ.एस.डी.सिंदखेडकर, उपप्राचार्या कल्पना पटेल यांच्यासह प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगला पाटील यांनी केले. आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.आर.व्ही.पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी विभागाच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.








