नंदुरबार | प्रतिनिधी
सारंगखेडा येथील ५७ लाख रुपयाचा १६ चाकी हायवा चोरी करणार्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने नाशिक येथून अटक केली आहे. मात्र, त्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.
तक्रारदार रऊफ रशिद खाटीक (रा.प्रकाशा ता. शहादा) यांच्या मालकीच्या टाटा सिग्मा कंपनीच्या पांढर्या रंगाचे कॅबिन व त्यावर निळया रंगाची बॉडी असलेला ५७ लाख रुपये किंमतीचा १६ चाकी हायवा (टिपर) (क्रमांक एम.एच. ३९ ए.डी. २२२७) हा दि.२ सप्टेंबर रोजी पहाटे ३.१० वाजेच्या सुमारास सारंगखेडा गावातील श्रीकृष्ण पेट्रोलपंपवरुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला. याबाबत सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सपोनि संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करुन तात्काळ गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यात रवाना केले.
सदर हायवामध्ये टाटा कंपनीचे व व्हिलसन कंपनीचे असे दोन जी पी एस सिस्टीम लावण्यात आलेले असतांना सुध्दा अज्ञात आरोपीतांनी सदर १६ चाकी हायवा चोरी केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकापुढे त्यांचा शोध घेणे हे एक मोठे आव्हान होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालकाकडून गाडीमध्ये असलेल्या जी पी एस बाबत माहिती घेतली असता दि.२ सप्टेंबर २०२२ रोजी गाडीचे चोरीस गेलेल्या गाडीबाबत माहिती घेतली असता ती सारंगखेडा- शहादा – निझर या मार्गे गुजरात राज्यातील सुरत येथे गेल्याचे समजले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जीपीएस चा माग काढत सुरत शहर गाठले.
जी.पी.एस. सिस्टीमचा माग काढल्यावर सदरचे जी.पी.एस. हे एका आयशर वाहनाच्या वरील कॅबीनवर आढळून आले. अज्ञात चोरट्यांनी जी.पी.एस. हे शहादा-सारंगखेडा या रस्त्यावरून जाणार्या आयशर वाहनावर टाकून तपास पथकाची दिशाभूल केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने सारंगखेडा येथून शहादा, शिरपूर, धुळे या मार्गाच्या सर्व ठिकाणांचे उपलब्ध असलेले सर्व सीसीटिव्ही फुटेज प्राप्त करून त्याआधारे चोरीस गेलेल्या वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सदर वाहन हे सारंगखेडा येथील श्रीकृष्ण पेट्रोलपंप वरून अनरद बारी येथून वळण घेवून शिरपूर रस्त्याकडे गेल्याचे समजले. सदर चोरी गेलेले वाहन हे शिरपूरकडून धुळ्याकडे जातांना दिसले. त्यावरून तपास पथकाला चोरी गेलेले वाहन हे धुळे शहरात असल्याची किंवा धुळ्याकडून चाळीसगावकडे गेल्याचे समजले. तपास पथकाने धुळे चाळीसगाव रस्त्यावरील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता सदर वाहन हे कन्नड-औरंगाबादच्या दिशेने गेल्याचे समजले. औरंगाबाद शहर मोठे असल्याने जालना, सोलापूर, पूणे, मुंबई, नाशिककडे चोरी गेलेले वाहन जावू शकते. याचा अंदाज घेवून तपास पथकाने प्रचंड मेहनत घेवून सदर वाहन हे औरंगाबाद येथून नाशिकच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाविली.
त्यानंतर तपास पथकाने आपला मोर्चा नाशिक शहराकडे वळविला. नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागातील माहिती घेवून ठिक-ठिकाणी पाहणी केली असता चोरीस गेलेल्या वाहनाबाबत कोणतीही उपयुक्त माहिती मिळाली नाही. तपास पथकाकडे चोरीस गेलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी कोणतीही तांत्रिक मदत शिल्लक नव्हती. त्यानंतर तपास पथकाने नाशिक शहरातील गॅरेज, चोरीचे वाहन घेणारे सराईत गुन्हेगार, जूने वाहनाचे स्पेअरपार्ट विकत घेणारेविक्री करणारे तसेच वाहनाचे इंजिन नंबर, चेसिस नंबर यात बदल करणारे यांच्याबाबत माहिती घेण्यास सुरूवात केली.
तपास पथकास नाशिक शहरातील राहणारा गुरुमुख सिंग उर्फ बिल्ला हा नाशिक शहरातील चारचाकी वाहने चोरणारा कुख्यात गुन्हेगार असून तो आजपावेतो पोलीसांच्या हाती लागला नसल्याची गोपनिय माहिती मिळाली.
गुरुमुख सिंग उर्फ बिल्ला हा मूळ पंजाबी असलेला इसम डोक्यावरील तसेच दाढी मिशीचे केस काढून वेषांतर करून त्याचे पंजाब येथील साथीदारांसह नाशिक शहरातील आडगाव परिसरात चोरी गेलेल्या वाहनाच्या विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली. तपास पथकाने आडगाव परिसरात शोधा-शोध सुरु केल्यावर नाशिक-धुळे महामार्गावर डी-मार्ट समोर एक १६ चाकी हायवा (टिपर) उभा असलेला तपास पथकास दिसला. तपास पथकाने चोरी केलेले वाहन तेच आहे याची खात्री करून वाहनात बसलेला इसम यास ताब्यात घेवून विचारपूस केली. वाहनातील संशयीत इसमास ताब्यात घेत असतांना चोरी गेलेल्या वाहनाजवळून एक इंडिका वाहन वेगाने निघून गेली.
वाहनातील संशयीत इसमास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मनजित सिंग कशमिर सिंग वय-३५ रा.वॉटर सप्लाय गल्ली, लोकल बस स्थानक जवळ, अमृतसर, जिंदलया गुरु, पंजाब राज्य ह.मु. संत जनार्धन अपार्टमेंट, आडगाव नाका, नाशिक असे सांगितले. तर पोलीस पथक आल्याचे पाहून इंडिका वाहनातून गुरुमुख सिंग अमर सिंग संधु उर्फ (बिल्ला) हरि सिंग राजपुत व बलजित सिंग (पुर्ण नाव माहिती नाही) हे पळून गेल्याचे सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कायदेशीर प्रक्रीया करुन गुन्ह्यातील चोरी गेलेला ५७ लाख रुपये किंमतीचा हायवा (टिपर) जप्त केला असून गुन्ह्यातील फरार आरोपी गुरुमुख सिंग अमर सिंग संधु उर्फ बिल्ला व त्याचा साथीदार बलजितसिंग यांना देखील लवकरच अटक केली जाईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी सागितले.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, विकास कापूरे, पोलीस अमलदार किरण मोरे, यशोदिप ओगले यांच्या पथकाने केली. पी.आर.पाटील यांनी तपास पथकास बक्षीस जाहीर केले आहे.