नंदुरबार l
शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदणी मोबाईलवरुन करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली नाही. अशा शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबर, 2022 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी करणे गरजेचे असून नोंदणी न केल्यामुळे विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-पीक पाहणीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी आपल्या मोबाईलवरुन प्ले-स्टोर मध्ये जाऊन ई-पीक पाहणी व्हर्जन-2 ॲप डाऊनलोड करून आपल्या पिकाची नोंदणी करावी. ई-पीक नोंदणी करतांना अडचण असल्यास मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संपर्क साधावा.
नंदुरबार जिल्ह्यातील तालुकानिहाय ई-पीक पाहणी अशी : नंदुरबार तालुका एकूण खातेदार 49 हजार 752 पैकी 17 हजार 326, नवापूर एकूण खातेदार 37 हजार 360 पैकी 11 हजार 312, शहादा एकूण खातेदार 52 हजार 910 पैकी 19 हजार 330, तळोदा एकूण खातेदार 15 हजार 972 पैकी 5 हजार 486, अक्कलकुवा एकूण खातेदार 21 हजार 972 पैकी 4 हजार 392, तर अक्राणी एकूण खातेदार 10 हजार 226 पैकी 1 हजार 889 असे सहाही तालुक्यांतील 1 लाख 88 हजार 192 खातेदारांपैकी 59 हजार 735 खातेदार शेतकऱ्यांनी आतापर्यंत खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणी केली आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुदतीत ई- पीक पाहणीची नोंदणी करावी, असे आवाहन श्रीमती खत्री यांनी केले आहे.