नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्यामधील शेवटच्या स्थायी सभेला अध्यक्षांसह सभापती व सदस्य अनुपस्थित राहिल्याने स्थायी सभा रद्द करण्यात आली. विशेष म्हणजे या सभेला पदाधिकार्यांपैकी उपाध्यक्ष व एक सभापती उपस्थित होते.
नंदुरबार येथील जिल्हा परिषदेत काल दि.११ ऑक्टोंबर रोजी याहामोगी सभागृहात स्थायी सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्यात अध्यक्ष व उपाध्यक्षांचे मुदत संपली असून त्यांना वाढीव कालावधी मिळाला होता.
त्यानंतर निवडणूक आयोगाने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी दि.१७ ऑक्टोंबर रोजी निवड करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जि.प.ची स्थायी सभेची कालची शेवटची सभा होती. यावेळी अध्यक्ष, सभापती तसेच सर्व सदस्य गैरहजर होते.
याठिकाणी फक्त उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी व शिक्षण सभापती अजीत नाईक उपस्थित होते. यामुळे स्थायी सभाच रद्द करण्यात आली. त्यानंतर या सभागृहातच ऍड.राम रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली होती.
यावेळी शिक्षण सभापती अजीत नाईक, अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी विविध विभागांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी ऍड.राम रघुवंशी यांनी सांगितले की, जुने धडगांव येथील शाळेत ८०० विद्यार्थी आहेत. मात्र तेथे शौचालय नाही. त्यामुळे त्याठिकाणी शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी. असे सांगत नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे येणारे औषधे हे एक्सप्रायरी डेट असलेले औषधे येतात. त्यामुळे चांगला ठेकेदार नेमूण जास्त मुदत असलेले औषधे मागविण्यात यावे. अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
दरम्यान आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी यावेळी सांगितले की, राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्ह्यात मोठया प्रमाणावर बालकांना जंत नाशक औषध देण्यात आले आहे. उर्वरीत बालकांना दि.१७ ऑक्टोंबर रोजी जंतनाशक औषध देण्यात येईल. सदरची आढावा बैठक अवघ्या २० मिनीटात समाप्त झाली.