नंदुरबार l प्रतिनिधी
पेट्रोल पंपाच्या व्यवसायात भागीदार असतांना याचा गैरफायदा घेवून बनावट लेटरपॅड, धनादेश तयार करुन तसेच वेळोवेळी रक्कम काढून सुमारे १४ लाखात फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरोधात शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा येथील अजय लक्ष्मीकांत छाजेड यास समीर हरुनभाई खिमानी यांच्या चोपडा येथील पेट्रोल पंपात सन २०२० पासून भागीदार होता. अजय छाजेड यास समीर खिमानी यांनी बायोडिझेल पेट्रोल पंपाचे अधिकार दिले असतांना त्याने त्याचा गैरफायदा घेवून खात्यावरुन वेळोवेळी चेकद्वारे तसेच एटीएम कार्डद्वारे पैसे काढून डिझेल विक्रीच्या उधारीचे पैसे परस्पर ग्राहकांकडून घेतले.
स्वत:चा आर्थिक फायदा करुन घेण्यासाठी अजय छाजेड याने निलेश लक्ष्मीकांत छाजेड याच्याशी संगनमत करुन त्याचे भुवल ट्रेडर्स शहादा यांच्याकडून पेट्रोल पंपाच्या नावाने ऊसनवार पैसे घेतल्याचा आरोप समीर खिमानी यांनी केला आहे. तसेच वैदेही सिताराम भगीरथ (रा.मालेगाव) व कुणाल (रा.मालेगाव) यांच्याशी जयमहावीर बायोडिझेल पेट्रोल पंपाच्या नावाचा लेटरपॅडचा उपयोग करुन त्यांना भागीदार करण्याचा खोटा करार करुन रक्कम दिल्याचे दाखवून भागीदारी रद्द केल्याचे दाखविले व खोटी तारीख टाकून चेक बाऊंस केले आहेत.
चौघांनी संगनमत करुन खोटे करारपत्र, खोटे चेक तयार करुन समीर खिमानी व त्यांचे भागीदार यांची एकूण १४ लाख २१ हजार ३१२ रुपयात फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच चौघांनी खोट्या नोटीस देवून समीर खिमानी यांच्यावर खोट्या केसेस केल्याचा आरोप करण्यात आला असून याबाबत खिमानी यांच्या फिर्यादीवरुन अजय छाजेड, निलेश छाजेड, वैदेही भगीरथ व कुणाल या चार जणांविरोधात शहादा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४०६, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे








