नंदुरबार | प्रतिनिधी
दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग व कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्टतर्फे यंदाचा जागतिक कृषीमहोत्सव विभागनिहायदि. ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान खान्देश विभागात जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुल येथे तसेच जानेवारीमध्ये नाशिक येथे जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग व कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्ट आयोजित जागतिक कृषीमहोत्सवाचे नाशिक येथे आयोजन करण्यात येते. परंतु लॉकडाऊनच्या काळात थेट शेताच्या बांधावर जाऊन सुमारे ११०० पेक्षाही अधिक ठिकाणी कृषीमहोत्सवाचे साप्ताहिक स्वरूपाचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे थेट गावपातळीवरील लाखो शेतकरी कृषी महोत्सवास जोडले गेले आणि यामुळेच यंदाच्या कृषी महोत्सवात महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून आयोजन करण्याबाबत मागणी होत आहे.
यासाठी यंदाचा कृषी महोत्सव प्रथम खान्देश विभागात एकलव्य क्रीडा संकुल जळगाव येथे होणार आहे. तसेच जानेवारी २०२३ मध्ये नाशिक याठिकाणी होणार आहे.दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांच्या व कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते मातीचे पूजन करून कृषीमहोत्सवास सुरुवात होणार आहे. यामध्ये खान्देश विभागातील हजारो तरुण सेवेकर्यांनी स्वयंप्रेरणेने आयोजक आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनातून अनोखी कृषीक्रांतीच घडविण्याची जबाबदारी आपल्या हाती घेतली आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर थेट परराज्य व परदेशातदेखील याच उत्साहात कृषी महोत्सवास मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचा प्रतिसाद मिळत आहे.
खान्देश विभागीय कृषीमहोत्सवाचे स्वरूप
कृषी प्रदर्शन व तज्ञांचे चर्चासत्र: या अंतर्गत राष्ट्रीय नामांकित कंपन्यांचे खते-औषधे, आधुनिक यंत्र सामग्री, सेंद्रिय-जैविक तंत्रज्ञान, शेती उपयोगी अवजारे, केळी, कपाशी, टिश्यू कल्चर, बी-बियाणे, पशुखाद्य, शेती आधारित प्रक्रिया उद्योग, कृषी पर्यटन, विमा व बँक आदी कृषी संबंधित वैविध्यपूर्ण बाबींचा सहभाग असणार आहे.खान्देश, कृषी संस्कृती व पशु-गौवंश प्रदर्शन : खान्देश संस्कृती दर्शन, पूर्वीचे स्वयंपूर्ण, समृद्ध, पर्यावरणपूरक गाव व त्यातील विज्ञान, खाद्य संस्कृती, सण-उत्सव मांडणीवनौषधी, रानभाज्या व देशी बियाणे प्रदर्शन:दुर्मिळ वनौषधींच्या प्रदर्शनाद्वारे आयुर्वेद शेती व बाजारपेठ माहिती, आहार-विहार पथ्य, नक्षत्रवन, कॅन्सर, मधुमेह यासारख्या असाध्य आजारांवर औषधी व तपासणी, शेतीच्या बांधावर ऋतूप्रमाणे उगवणारे तन व त्या तनाचा शेतीसाठी असणारा उपयोग, तसेच त्याद्वारे मिळणारे अधिक उत्पन्न या बाबींची माहिती व प्रशिक्षण.मोफत आरोग्य तपासणी व व्यसनमुक्ती शिबिर : सद्गुरू मोरेदादा चॅरीटेबल ट्रस्ट हॉस्पिटलद्वारे विविध वयोगटातील व्यक्तींची व आजारांची मोफत आरोग्य तपासणी व व्यसनमुक्ती शिबिराचे देखील या तीन दिवसांत आयोजन केले जाणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
दि.७ तारखेला सकाळी ९ वाजता कृषीदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होऊन मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होईल त्यानंतर केळी, कापूस, मका या प्रमुख पिकांच्या विषमुक्त शेती बाबत तज्ञांचे चर्चासत्र होऊन दुपारच्या सत्रात स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे महिला बचत गटांना उद्योगाच्या संधी, कृषी आधारित प्रक्रिया उद्योग, नोकरी इच्छुकांना विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
दि.८ रोजी सकाळी ९ वाजता पशु-गौवंश या विषयातील तज्ञाचे चर्चासत्र आयोजित केले असून दुपारी १२ वाजेपासून शेतकरी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे.
सदर वधू-वर परिचय मेळावा हा सर्व जाती-धर्मीयांसाठी व विनामुल्य पद्धतीचा आहे.दि.९ ला पहिल्या सत्रात सकाळी पर्यावरण तज्ञांचे चर्चासत्र आयोजित केले असून दुपारच्या सत्रात सरपंच व ग्रामसेवक मांदियाळीचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी तज्ञांच्या ऑनलाईन चर्चासत्रांचा देखील या निमित्ताने रोज घरबसल्या लाभ घेता येऊ शकतो. यासाठी“Krushi Mahotsav” किंवा “Dindori Pranit Sevamarg”या युट्युब चॅनेलद्वारे रोज कृषी तज्ञांचे मार्गदर्शन ऑनलाईन पाहता येईल. तसेच या किंवा पुढील होणार्या कृषी महोत्सवात ज्या शेतकर्यांना, सरपंच, पर्यावरणस्नेही, कृषीप्रेमी यांना सहभागी व्हायचे असेल www.krushimahotsav.org या संकेतस्थळावर अथवा Krushi Mahotsav या ऍपला भेट देऊन विस्तृत माहिती घ्यावी. प्रत्येक ठिकाणी होणार्या कृषी महोत्सवातून सेंद्रिय व नैसर्गिक शेती संदर्भात शेतकर्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे, सेंद्रिय खत-औषधांची निर्मिती करणे, पशु व गौवंश पालन व संवर्धन आदी बाबींची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात येत आहे.
तसेच सेंद्रिय व नैसर्गिक उत्पादक शेतकर्यांना दिंडोरीप्रणीत फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सात्विक कृषिधन व सात्विक मार्ट या ब्रँड अंतर्गत हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे, याचा समस्त शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक आबासाहेब मोरे यांनी केले आहे.
शाकंभरी बीज भांडार या उपक्रमातून संकलित व संवर्धित केलेल्या शेकडो देशी व गावरान बियाण्यांचा शेतकर्यांना लाभ घेता येईल. गडचिरोली ते सिंधुदुर्ग, सोलापूर ते पेठ-सुरगाणा, हर्सूल अशा दुर्गम भागात देखील कृषीमहोत्सवाचे आयोजन स्थानिक शेतकरी व तरुणांच्या माध्यमातून करत दरवर्षी प्रमाणेच यंदाच्या जागतिक कृषी महोत्सवाच्या माध्यमातून देखील हजारो तरुणांना शेती विषयक आवड निर्माण करण्याचे व शेतकर्यांना सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळविण्याचे महान कार्य सेवामार्गाच्या कृषीशास्त्र विभागाद्वारे होत आहे.
कृषीमाऊली सत्कार
या महोत्सवात देखील आदर्श सरपंच, आदर्श ग्रामसेवक, नैसर्गिक शेती,देशी बियाणे, गोसेवा, गोसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कृषी जोड व्यवसाय, विविध माध्यमांमधून शेतकरी विकासाचे लिखाण, कृषी शासकीय सेवा अशा विविध विषयांमध्ये आदर्श कार्य करणार्या व्यक्ती-संस्थांचा कृषीमाऊली सत्कार देवून गौरव करण्यात येणार असल्याचेही आबासाहेब मोरे यांनी सांगितले.








