नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अधिकाधिक कामे सुरू करा, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री म्हणाल्या, कमी पावसामुळे शेती उत्पादन कमी होण्याची शक्यता लक्षात घेता कामाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेल्फवरील कामे त्वरित सुरू करण्यात यावेत. ग्रामपंचायत ही सक्षम यंत्रणा असल्याने गावस्तरावर अधिक कामे घेणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या आवश्यकतेनुसार कामे त्वरित सुरू करावी. डोंगराळ भागात वन विभागाने नवीन कामे सुरू करून नागरिकांना रोजगार उपलब्ध करून घ्यावे. काम वेळेवर उपलब्ध होईल असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण केल्यास गाव विकासाची चांगली कामे होण्यासोबत स्थलांतर रोखता येईल.
अधिकाऱ्यांनी दररोज शेल्फवरील कामांचा आढावा घ्यावा. 15सप्टेंबरपर्यंत कामे सुरू करण्याचे नियोजन करावे. सिंचन विहिरींची मंजूर कामे करण्यास संबंधित तयार नसल्यास त्याऐवजी गरजूंना अशी कामे देण्यात यावीत. शाळा-अंगणवाडी समोरील रस्ते, संरक्षक भिंत, खेळाचे मैदान, सार्वजनिक विहीर, सपाटीकरण अशी उपयुक्त कामे घ्यावीत. पुढील वर्षांसाठी विहीर पुनर्भरण कामाचे नियोजन आतापासून करावे. अंगणवाड्याची अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावी. जलशक्ती अभियानांतर्गत शोषखड्ड्यांची कामे त्वरित पूर्ण करावी. शेततळे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, कंपार्टमेंट बडींग, सीसीटी अशा उपयुक्त कामांचे नियोजन करावे. नेहमीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट कामांचे नियोजन करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीस तहसिलदार, गट विकास अधिकारी, कृषि अधिकारी, वन आणि सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.