नंदुरबार l प्रतिनिधी
ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे २८ व २९ ऑगस्ट रोजी सुरू राहतील.
या उपलब्ध सुविधेसह कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन डिजिटल माध्यमातून ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल ॲपवर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल माध्यमांचा वापर करून घरबसल्या वीजबिल भरता येईल व स्वतःसह इतरांचा संसर्गापासून बचाव करता येईल. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.