नंदुरबार l
अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग कोरडा दुष्काळ घोषीत करावा, अशी मागणी आम आदमी शेतकरी संघटनेचे नंदुरबार तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली आहे. तसे निवेदन तहसिलदार कार्यालयास देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे, नंदुरबार तालुक्यातील रनाळा व शनिमांडळ या भागात अत्यंत कमी प्रमाणात पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांची परिस्थिती अत्यंत खालावली असून शनिमांडळ व रनाळे सर्कलमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करुन शासनाची आर्थिक मदत तात्काळ मिळावी. तसेच वरिल भागात सिंचन सुविधेचा अभाव असल्यामुळे प्रकाशा-बुराई सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याला गती देवून
नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात कृषि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे. तसेच पुढील रब्बी हंगामासाठी शेतकर्यांना उच्च दर्जाचे बियाणे कृषि विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करुन द्यावे. सदरील भागातील शेतकर्यांची परिस्थिती खालावली असून शेतमजूराच्या हातालाही काम नाही.
त्यामुळे पुढील रब्बी हंगामात नंदुरबार तालुक्यातील शेतकर्यांच्या हितासाठी रोजगार हमी योजनेतून शेती कामे द्यावीत व तशा उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरुन शेतकर्यांना दिलासा मिळेल. तहसिलदार कार्यालयातील अव्वल कारकून हिरालाल गुले यांना निवेदन देतेप्रसंगी जितेंेद्र पाटील, योगेश पाटील, सावळीराम करिया, विठ्ठल भिल, देवा गोथकर आदी उपस्थित होते








