नंदुरबार l

नवरात्रोत्सवानिमित्त खोडाई देवीचा यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. तसेच जगाला शांतीचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर साहब यांच्या जयंतीनिमित्त 9 ऑक्टोंबरला मिरवणुक काढण्यात येणार आहे. म्हणुन या सण-उत्सवात 108, 102 या रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी व औषधींसह उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी ईस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांनी केली आहे. या मागणीची दखल घेत सदर सण-उत्सवाच्या काळात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करुन देेण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे यांनी जारी केले.
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार येथील ग्रामदैवत खोडाई देवीच्या यात्रेला नवरात्रोत्सवानिमित्त सुरुवात झाली आहे. दि.26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 2022 पर्यंत खोडाई देवी यात्रा भरणार असून आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने यात्रास्थळी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकार्यांचे पथक व 108, 102 या रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच आरोग्य जनजागृती देखील करण्यात यावी.
यात्रोत्सवाच्या काळात खोडाई देवी मंदिरासह परिसरातील वीज पुरवठा नियमितपणे सुरळीत ठेवण्यात यावा. त्याचबरोबर जगाचा शांतीचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर साहब यांच्या जयंतीनिमित्त दि.9 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता नंदुरबार येथील जामा मस्जिद येथुन हजरत मोहम्मद पैगंबर साहब यांच्या जयंतीची मिरवणुक सालाबादप्रमाणे काढण्यात येणार आहे.
या मिरवणुकीवेळी देखील 108 व 102 असलेल्या रुग्णवाहिकांसह वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी ईस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान, मोहन श्रॉफ, तनवीर अहेमद, अरशद सैय्यद, मुक्तार सैय्यद आदींनी केली आहे.









