नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कामाचे श्रेय घेण्यामुळे आंबेडकर चौकातील नवीन सभागृहासाठी एनओसी दिली जात नसल्याचा आरोप करत भाजपा नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यामळे बैठकीचे वातावरण तापले होते.
नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे होते. यावेळी मुख्याधिकारी श्री.बागुल आदी उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेत पटेलवाडीमधील खुल्या जागेत असलेले सभागृह, ग्रंथालय प्रयोजनासाठी भाडेतत्वावर मिळण्याबाबत विचारविनीमय करण्यात आला तसेच नंदुरबार नगरपालिकेची नुतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळयाच्या निमित्ताने होणार्या संभाव्य खर्चास मंजूरी देण्यात आली. यावेळी विविध ११ विषयांना मंजूरी देण्यात आली.
यावेळी भाजपाचे नगरसेवक गौरव चौधरी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, प्रभाग क्रमांक १८ मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील समाज मंदिर बांधून बरेचवर्ष झाले आहे. त्यामुळे समाज मंदिराची अवस्थाजीर्ण झाली असून याबाबत पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी इमारत जीर्ण झाल्याची माहिती सभागृहाला दिली होती. असे असतांना उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक आमदाराला ५ कोटी दिले होते.
त्यातून प्रभाग क्रमांक १८ मधील सभागृहासाठी निधी मिळाला आहे. मात्र नगरपालिका श्रेयाचे राजकारण करीत असून त्यांनी जीर्ण झालेली इमारत पाडून नवीन इमारत बांधकामासाठी एनओसी दिली नाही. यावेळी विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर भाजपाचे नगरसेवक प्रशांत चौधरी आक्रमक झाले. जीर्ण झालेल्या इमारतीवर नंदुरबार नगरपालिकेने खर्च केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मात्र २०१८ साली इमारत जीर्ण असल्याचा सांगितल्यानंतरही पालिकेने त्याच्या दुरूस्तीसाठी दोन लाखाचा खर्च केल्याचे ऐकून नगरसेवकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या. त्यासोबत कामाच्या श्रेयासाठी मंजूरी मिळत नसल्याचे कारण सांगत भाजपाचा नगरसेवकांनी निषेध व्यक्त करत सभात्याग केल्याने वातावरण तापले होते.









