नंदुरबार l
धडगाव तालुक्यातील खडक्या येथील विवाहित मुलीवर सामुहिक अत्याचार केल्यानंतर मुलीचा खुन झालेला असतांना पोलिस अधिका-यांनी मुलीच्या पित्याचे न ऐकता आत्महत्येचा गुन्हा दाखल करून हलगर्जी केल्याप्रकरणी धडगावचे तत्कालीन पोलिस निरीक्षक गोकूळ औताडे व एपीआय बी के महाजन यांना निलंबित करण्यात आले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी तसेच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
धडगाव येथील पिडीत पित्याने आपल्या मुलीचे शव मिठात दफन करून शवाचे पुनर्विच्छेदनाची मागणी केली होती. या मागणीला न्यायालयाच्या परवानगीने मुंबई येथील जे जे हॉस्पीटलमध्ये पुन्हा शव विच्छेदन करण्यात आले होते.
धडगाव प्रकरणात हलगर्जी केल्याप्रकरणी पोलिस अधिकारी व कर्मचा-यांना कंट्रोल रूममध्ये बदली करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये बदली करण्यात आलेल्या पोलिस अधिका-यांना केवळ बदली करून न थांबता त्यांना घरीच पाठवावे. ,अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी तसेच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत पेालिस अधिका-यांना निलंबन करण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पेालिस महानिरीक्षक डॉ बी.जी.शेखर.पाटील यांना दिले.त्यानंतर शुक्रवारी दोघा अधिका-यांना तात्काळ निलंबन करण्यात आले आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी धडगाव तालुक्यात पिडीत वडिलांची १६ सप्टेंबर रोजी भेट घेतली होती. त्यानंतर पोलिस अधिका-यांच्या निलंबनाची मागणी केली होती.. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तातडीने नंदुरबारचा दौरा करीत पिडीत मुलीच्या दफनस्थळ व पिडीत मुलीच्या पित्याशी संपर्क साधून पुर्ण माहिती जाणून घेतली.
पोलिस विभाग संरक्षणासाठी असते. परंतू पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे या पोलिस अधिका-याने या घटनेकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले होते. बलात्कार,खुनाचा गुन्हा दाखल न करता आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला हे अंत्यंत चुकीचे होते,असे भाजपाच्या पदाधिका-यांचे म्हणणे होते.. अशा अधिका-यांना निलंबित करणे हा एकच पर्याय असु शकतो. ,अशी स्पष्ट भुमिका भाजपाचे विजय चौधरी यांनी घेतली होती. दोघे पोलिस अधिकारी निलंबित झाल्याने पिडीत मुलीच्या पित्याने समाधान व्यक्त केले आहेतसेच न्याय मिळाल्याची भावना उमटली आहे. भाजपा हा पक्ष आदिवासींसाठी संवेदनशिल आहे,अशी भावना आदिवासी समाजात उमटली आहे.