नंदुरबार l
जिल्ह्यातील जवळपास २०० ते २५० समुदाय आरोग्य अधिकारी यांनी आज नंदुरबार जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढत मुख्याधिकारी यांची विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर समुदाय आरोग्य अधिकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी आपल्या विविध समस्यांचे गार्हाणे मांडले.
मागील वर्षापासून तालुका निहाय समुदाय आरोग्य अधिकारी यांचा दुर्गम भाग भत्ता व प्रोत्साहन भत्ता तसेच मासिक वेतन बाकी आहे. नंदुरबार, तळोदा, शहादा, नवापूर, अक्कलकुवा व धडगाव येथील जवळपास ऑक्टोंबर २०२१ ते जुलै २०२२ पर्यंत चा भत्ता बाकी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे,
नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी यांची जवळपास दोन लक्ष ८८ हजार रुपये इतकी रक्कम पगार इन्सेंटिव्ह व हार्डशिप या स्वरूपातली रक्कम बाकी आहे, अशा परिस्थितीत सर्व समुदाय आरोग्य अधिकारी व हे आर्थिक व मानसिक या दोन्ही प्रकारच्या तणावाखाली असून त्या परिस्थितीत परिवार कसा चालवा अशा आर्थिक विवंचनेत असतात. त्यामुळे सदरची रक्कम दि.३० सप्टेंबर २०२२ च्या आत देण्यात यावी, समुदाय आरोग्य अधिकारी यांचे पगार इन्सेटिव्ह व हार्डशिप हे दरमहा वेळेवर होत नाही,
शासनाच्या नियमानुसार पगार दरमहा पाच तारखेच्या आत व इन्सेंटिव्ह हे दहा तारखेच्या आत देण्यात यावे महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात हे नियमित होते तर नंदुरबार जिल्ह्यातच का हा अन्याय? अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपकेंद्र स्तरावर एनसीडी स्क्रीनिंग चालू असताना पुरवठा व एनसीडी मेडिसिन हे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर उपलब्ध करून देण्यात येत नाहीत,
तेदेखील नियमितपणे उपलब्ध करून देण्यात यावे, अथवा प्रोत्साहन भत्ता मधुमेह स्क्रीन व मधुमेह उपचार यांच्या सकट देण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे स्क्रीनिंग झाल्यानंतर त्यांची ऑनलाइन एन्ट्री एनसीडी आयटी सॉफ्टवेअर मध्ये टाकण्याची जबाबदारी जॉब चार्ट नुसार शासनाने परिचारिका व औषधतंत्रज्ञ यांच्यावर निश्चित केली आहे. तरी देखील त्याची विचारणा ऑनलाइन कामांची एन एम व एम पी डब्ल्यू यांना करण्यात यावी, तसेच समुदाय आरोग्य अधिकारी यांना मागील वर्षापासून नंदुरबार जिल्हाकरिता दरमहा पंधरा हजार रुपये याप्रमाणे हार्डशिप अलाउन्स हा मंजूर करण्यात आला असून तो देखील कामावर आधारित देण्यात येत आहे
प्रत्यक्षात हार्ड एरिया अलौंस हा पूर्ण देण्यात येतो. तरी तो कामावर आधारित न देता सरसकट १५००० रुपये याप्रमाणे देण्यात यावा, समुदाय आरोग्य अधिकारी यांना कामावर आधारित मोबदला देण्यासाठी इन्सेंटिव्ह अहवालामध्ये कॉलम नंबर चार मधील मार्गदर्शनानुसार कामावर आधारित मोबदला देताना ऑनलाईन पोर्टल अथवा उपकेंद्र रजिस्टर मधील नोंदी पाहून देय आहे
परंतु जिल्हास्तरावरून हे देताना फक्त ऑनलाईन पोर्टल पाहिले जात आहे जे समुदाय आरोग्य अधिकार्यांना अन्यकारक आहे, अशा विविध प्रकारच्या मागण्या समुदाय आरोग्य अधिकारी यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देऊन त्यांच्यासमोर मांडल्या व सर्व मागण्या या ३० सप्टेंबर २०२२ च्या पूर्वी सोडवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ.तुषार धामणे,उपाध्यक्ष मृणालिनी जाधव, सचिव डॉ.गौरव सोनवणे, डॉ.जितेंद्र बिरारे, डॉ.संदीप काकुस्ते, डॉ.सचिन नेरकर व डॉ.रेखा नाईक यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.