शहादा l
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व श्री पी.के.अण्णा पाटील फाउंडेशन,शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने कै.अण्णासाहेब पी.के. पाटील स्मृती आंतर महाविद्यालयीन विभागीय”पुरुषोत्तम वक्तृत्व” स्पर्धा दि.20 सप्टेंबर 2022रोजी उत्साहात संपन्न झाली .
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ शहादा ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. सहकार व शिक्षण महर्षी कै. अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या कर्तृत्वाने ही संस्था शिखराप्रत पोहोचली आहे.



पुरोगामी महाराष्ट्रातील पश्चिम खान्देशातील गांधी विचारांची आच, आस आणि कास असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अण्णासाहेब पी. के. पाटील होय. आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण, सहकार व समाजसुधारणा यासाठी अर्पण करून कै. अण्णासाहेब हे दि.18 सप्टेंबर 2014 रोजी अनंतात विलीन झाले. सन 2015 पासून त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते.यावर्षी आठव्या स्मृतिदिनानिमित्त “आंतर महाविद्यालयीन विभागीय पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम वक्ते, वाचनपटू व विचारवंत निर्माण व्हावेत. त्यांनी वेळोवेळी महत्त्वाच्या विषयांवर सखोल चिंतन करावे.ते समाजासमोर मांडावे. हा सद्हेतू समोर ठेवून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात आले होते. वक्तृत्व स्पर्धेचे विषयांत अमृत महोत्सवी भारत,सहकार चळवळीचे भविष्य, गड्या आपला गाव बरा व आजची प्रासंगिक मूल्य या चार विषयांचा समावेश होता.
आंतर महाविद्यालयीन विभागीय वकृत्व स्पर्धेत नियमावलीनुसार प्रथम नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना सहभागाची संधी देण्यात आली होती. आणि सदर स्पर्धा ही विनामूल्य होती.सहभागी प्रत्येक स्पर्धकाला दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर 5 मिनिटे बोलण्याची संधी देण्यात आली होती.
सदर वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील होते.यावेळी दूध संघाचे माजी चेअरमन उध्दव पाटील, दिलीप पाटील,बन्सीभाई पाटील, विविध विद्या शाखांचे प्राचार्य उपस्थित होते. सकाळच्या सत्रात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून उद्घाटन करण्यात आले.या स्पर्धेमध्ये नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
त्यात प्रथम पारितोषिक इम्रानखान रशीदखान (महाराज सयाजीराव गायकवाड महाविद्यालय,मालेगाव जि.नाशिक) रूपये दहा हजार, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह (पाच हजार स्पर्धक व पाच हजार महाविद्यालय), द्वितीय पारितोषिक धर्मेश साहेबराव हिरे (विद्यावर्धिनी महाविद्यालय,धुळे जि.धुळे) रूपये सात हजार, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह (3500 स्पर्धक व 3500 महाविद्यालय), तृतीय पारितोषिक प्रणव मधुकर सोनवणे (आर.सी. पटेल महाविद्यालय शिरपूर जि.धुळे) रूपये पाच हजार, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह (अडीच हजार स्पर्धक व अडीच हजार महाविद्यालय), उत्तेजनार्थ पारितोषिक तेजस्विनी हरपालसिंग गिरासे (औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय,शहादा जि.नंदुरबार) व प्रफुल्ल तोताराम माळी(कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कुसूंबा जि.धुळे) यांना रूपये एक हजार, प्रमाणपत्र मंडळाच्या सचिव श्रीमती कमलताई पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
तसेच सहभागी सर्व स्पर्धकांनाही सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले आहे.सदर स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रा. डॉ.विलास चव्हाण, प्रा.डाॅ.योगिता पाटील यांनी काम पाहिले. या खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या संयोजन नियोजन व यशस्वीतेसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ तथा श्री पी. के.अण्णा पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, श्री.पी. के.अण्णा पाटील फाउंडेशनचे उपाध्यक्ष व मंडळाचे शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समितीचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य डॉ. विश्वासराव पाटील,
कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील, सदस्य डॉ.एस.पी.पवार, सदस्य प्रा.डॉ.विजयप्रकाश ओ. शर्मा, सदस्य प्रा.डॉ.तुषार पटेल,प्रा.डाॅ.चंद्रशेखर सुतार, प्रा.कल्पना पटेल यांनी परिश्रम घेतले.उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.डाॅ.चंद्रशेखर सुतार यांनी केले. पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.तुषार पटेल यांनी केले.स्पर्धेसाठी विद्याश्रम परिवारातील विविध महाविद्यालयांच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.