नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे घरकुलाबाबत चेक मंजूर करून देतो असे सांगून महिलांच्या अंगावरून दागिने काढून घेणारा सराईत आरोपी नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 6 सप्टेंबर 2022 रोजी नंदुरबार शहरात नवापुर चौफुली ते साक्री रस्त्यालगत आर.टी. ओ . ऑफीस शेजारी वृध्द महिला यांना एका काळ्या रंगाचा विना नंबर प्लेट असलेल्या मोटार सायकलवरील अनोळखी इसमाने सांगीतले की , आपणास घरकुल मंजुर झाले आहे . त्या घरकुलचा चेक मी तुम्हाला मंजुर करुन देईल . त्याकरीता तुम्हाला काहीतरी रक्कम द्यावी लागेल असे सांगुन व बोलण्यात गुंतवुन सदर महिलेच्या गळ्यातील 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र लबाडीने काढून नेले होते .
काही वेळानंतर महिलेला गळयात मंगळसूत्र नसल्याची खात्री झाल्याने तिने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 420 प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता . दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने गुन्ह्यातील अज्ञात आरोपीताचा व मुद्देमालाचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी रविंद्र कळमकर यांना आदेशीत केले . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , नंदुरबार जिल्ह्यात घरकुलाबाबत चेक मंजूर करून देतो असे सांगून महिलांच्या अंगावरून दागिने काढून घेणारा सराईत आरोपी हा औरंगाबाद येथील मिसरवाडी परिसरात राहणारा असून तो सध्या नंदुरबार शहरातील अव्वलगाजी दगां धुळे चौफुली परिसरातच फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली .
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी बातमीची खात्री करुन कायदेशीर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकास आदेश दिले . स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीत रवाना होवून नंदुरबार शहरातील अव्वलगाजी दर्गा धुळे चौफुली परिसरात सापळा रचला . तेथे अव्वलगाजी दर्गाचे भिंतीलगत एक इसम हा त्याच्या ताब्यातील विना नंबर प्लेटची काळ्या रंगाची होंडा शाईन मोटार सायकलवर बसलेला दिसून आला . पोलीस पथकाने शेख फेरोज शेख अहेमद , रा . गल्ली नं .8 , मिसरवाडी , औरंगाबाद याला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या संशयीत इसमाला वरील प्रमाणे दाखल गुन्ह्यातील वृध्द महिलेच्या सोन्या मंगळसुत्राबाबत विचारपूस केली असता तो कोणतेही समाधानकारक उत्तर देत नव्हता , म्हणून संशयीतास स्थानिक गुन्हे शाखा येथे आणून सखोल विचारपूस केली असता , त्याने नंदुरबार शहरात नवापुर चौफुली ते साक्री रस्त्यालगत आर.टी.ओ. ऑफीस शेजारी एका पोल्ट्रीफॉर्म जवळ उभी असलेल्या महीलेला बोलण्यात गुंतवून ठेवून गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र लबाडीने काढुन घेतल्याची कबुली दिली . सदर संशयित आरोपी याच्याकडून वृध्द महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र व त्याने गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटार सायकल असा एकुण 85 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आला आहे . ताब्यात घेतलेला संशयित आरोपी शेख फेरोज शेख अहेमद याच्यावर अशाच प्रकारचे अनेक गुन्हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात दाखल असल्याचे समजून आले असून त्या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करीत आहेत .
सदरची कार्मागरी ही पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस नाईक विशाल नागरे , मोहन ढमढेरे , राकेश मोरे , पोलीस कॉन्सटेबल अभय राजपुत , आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे .








