शहादा l
शहादा येथील पटेल रेसिडेन्सी सभागृहात साहित्य क्षेत्रातील पहिला व ऐतिहासिक उर्दू मराठी गझल मुशायरा रंगला. रसिक श्रोते आणि गझलकार यांच्या साद प्रतिसादाने ही साहित्य पर्वणी अनोखी ठरली.गझल मंथन साहित्य संस्था नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने या विशेष मुशाय-याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नामांकित मराठी उर्दू गझलकार एजाज शेख (भुसावळ) उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार व गझल गायक डॉ. मिलिंद कुलकर्णी, उद्योजक शरद पाटील, उद्योजक नूहभाई नुरानी, उद्योजक कल्पेश पटेल आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सुरेश भट यांच्या प्रतिमेचे व देवता पूजन, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
यानंतर गझल मंथन संस्था मुशायरा समितीचे उपाध्यक्ष गझलकार विष्णू जोंधळे, राज्य प्रसिद्धीप्रमुख गझलकार भरत माळी, खान्देश विभाग प्रमुख गझलकारा हेमलता पाटील, अलका जोंधळे, अरूण राठोड, रविंद्र जमादार यांच्या हस्ते मान्यवरांसह गझलकारांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ गझलकार अफजल मन्सूरी, शब्बीर राही मालेगावी यांच्या खास ऊर्दू रिवाजातील गझलांनी जाणकारांचे लक्ष वेधले.
यानंतर गझलकार संजय गोरडे, गझलकार राज शेळके गझलकार प्रमोद राठोड, गझलकार राहूल कुलकर्णी, धुळे जिल्हाध्यक्षा गझलकारा अनिता खैरनार, यांनी सादर केलेल्या दर्जेदार मराठी गझल रसिकांची दाद मिळवली. गझलकार प्राचार्य शिवाजीराव साळुंखे यांच्या तरन्नुममधील गझल, ज्येष्ठ गझलकारा हेमलता पाटील यांच्या मराठी आणि उर्दू गझल, गझलकार संदीप पाटील यांच्या मराठी आणि उर्दू गझल, गझलकार आकाश कंकाळ याच्या मिश्र द्विभाषिक गझल आणि गझल मुशाय-याचे अध्यक्ष एजाज शेख यांच्या मराठी उर्दू गझलांनी सभागृह जिंकले.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विष्णू जोंधळे यांनी केले. तर गझल मुशाय-याचे बहारदार सुत्रसंचालन आकाश कंकाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हेमलता पाटील, शरद पाटील, कल्पेशभाई पटेल, नुहभाई नुरानी, अलका जोंधळे, सुकेशीनी पानपाटील, कुणाल शिरोडे, गोरख वाल्हे यांनी सहकार्य केले.








