नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा या नगरपालिका निवडणुकांसह आगामी सर्वच निवडणुका भाजपा आणि शिंदे गट एकत्रितपणे लढू अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना दिली. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील इतर पक्षांतील काही बडे नेते भाजपात प्रवेश करतील, असेही सूतोवाच यावेळी करण्यात आले.
भाजपाच्या संघटनात्मक बांधणीसाठी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे हे राज्याचा दौरा करत आहेत. आज ते नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते.
श्री. बावनकुळे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा या नगरपालिका निवडणुकांसह आगामी सर्वच निवडणुका भाजपा आणि शिंदे गट एकत्रित युती करून लढणार आहोत. यासाठी संबंधित नेत्यांशी चर्चा करण्यात येवून निवडणुकीबाबत रणनीती ठरविण्यात येईल. तसेच आपापसातील मतभेद मिटवण्यात येतील, असेही ते म्हणाले. तसेच भाजपमध्ये येण्यासाठी इच्छूक असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गटातील नाराज नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे पक्षात स्वागत केले जाईल.
आगामी काळात आपण विचारही करू शकणार नाहीत अशी राजकीय उलथापालथ जिल्ह्यात दिसेल असे सूतोवाचही यावेळी बावनकुळे यांनी केले.
यावेळी आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित, युवा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आ.राजेश पाडवी, माजी आ.शिरीष चौधरी, डॉ. शशिकांत वाणी, राजेंद्रकुमार गावित आदी उपस्थित होते.








