नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकाच्यावतीने पीक कर्ज वाटप मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
शहादा तालुक्यातील सारंगखेडा, प्रकाशा, म्हसावद, पाडळदा 3 सप्टेंबर 2021 रोजी, 4 सप्टेंबर रोजी वडाळी, मंदाणे, ब्राम्हणपुरी, बामखेडा, असलोद, 7 सप्टेंबर रोजी तळोदा तालुक्यातील मोड, बोरद, प्रतापपुर, सोमावल, 8 सप्टेंबर रोजी नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी, रनाळा, शनिमांडळ, कोपर्ली, 9 सप्टेंबर रोजी नंदुरबार तालुक्यातील आष्टे, धानोरा येथे आणि त्याच दिवशी नवापूर तालुक्यातील खांडबारा व श्रावणी येथे तर 20 सप्टेंबर 2021 रोजी नवापूर तालुक्यातील विसरवाडी, चिंचपाडा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल.
अक्कलकुवा तालुक्यातील खापर, वाण्याविहीर, कोराई, अक्कलकुवा येथे 21 सप्टेंबर रोजी आणि 22 सप्टेंबर 2021 रोजी अक्राणी तालुक्यातील राजबर्डी, मांडवी, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे पीक कर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या पीक कर्ज मेळाव्यात पीक कर्ज, पशुसंवर्धन आणि मस्त्य व्यवसायासाठी खेळते भांडवल पात्रतेनुसार मंजूर करण्यात येईल. मेळाव्यात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, बँक प्रतिनिधी, क्षेत्रीय अधिकारी, सोसायटी अधिकारी, पशुधन अधिकारी तसेच मत्स्य विकास अधिकारी उपस्थित राहणार आहे.
ज्यांनी यापूर्वी कर्ज घेतले नसेल अशा शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, फेरफार नक्कल, पीकपेरा प्रमाणपत्र, बागायती जमीन असल्यास सातबारामध्ये नोंद इत्यादी कागदपत्रासह पीक कर्ज मेळाव्यांच्या दिवशी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक जयंत देशपाडे यांनी केले आहे.