नंदुरबार l
सणासुदीच्या कालावधीमध्ये जनतेकडून मिठाई व इतर अन्न पदार्थ जसे खवा मावा, घी, रवा, मैदा, आटा, वनस्पती, खाद्य तेल इत्यादीची मागणी मोठया प्रमाणात केली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे असे आवाहन अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) संतोष कांबळे यांनी केले आहे.
मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल आस्थापनेचा परिसर हा स्वच्छ असावा, कच्चे अन्न पदार्थ दुध, खवा, खाद्यतेल, वनस्पती इत्यादी परवानाधारक व्यवसायिकांकडून खरेदी करावे. पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, तयार अन्नपदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच व्यवस्थित झाकून ठेवावेत, मिठाई ही 24 तासांच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत.
खाद्यतेलाचा वापार दोन ते तीन वेळाच करावा. विक्रेत्यांनी त्याचे बिलावर एफएफएसएआय परवाना क्रमांक नमूद करावा. मिठाई बनविताना तसेच हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोज्याचा वापर करावा. मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्य दर्जाचे व उच्च प्रतीचे असावे, मिठाई हाताळताना हात वारंवार स्वच्छ धुवावे, विक्री बिलावर अन्न परवाना क्रमांक नमूद करण्यात यावा,
त्याचप्रमाणे विक्रीसाठी सुटटया स्वरुपातील भारतीय मिठाईच्या ट्रे वर “बेस्ट बिफोर डेट” (या दिनांकपूर्वी खावा/वापरावा) नमूद करण्यात यावी, मुदतबाह्य अन्न पदार्थ कोणत्याही परिस्थितीत साठा व विक्री करू नये. जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी या सर्व सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.








