नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील सिरसाणी हनवारीपाडा येथे जादूटोणा करुन जिवेठार मारल्याच्या संशयातून महिलेस मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील सिरसाणी हनवारीपाडा येथील सपना सुभाष पाडवी या महिलेने जादूटोणा करुन वेरंग्या कागडा पाडी यास जिवेठार मारले. असा संशय घेवून कागडा माद्या पाडवी, उदेसिंग वेरंग्या पाडवी, निर्मल वेरंग्या पाडवी, विरसिंग कागडा पाडवी व रेमतीबाई वेरंग्या पाडवी सर्व रा.सिरसाणी ता.धडगाव यांनी सपना पाडवी यांच्या घरी जावून हाताबुक्यांनी मारहाण केली.
तसेच जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत सपना पाडवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६, महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम कलम ३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे करीत आहेत.








