नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील डाब (देवगोई) येथे जागेच्या वादातून दोन गटात वाद झाला. या वादातून झालेल्या मारहाणीत दोघांना दुखापत झाली असून 70 हजाराची रोकड व साडेतीन लाख रुपयांची सोन्याची चेन काढून नेल्याप्रकरणी परस्पर फिर्यादीतून दोन्ही गटातील 70 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील डाब (देवगोई) येथील भरतसिंग नसकरीया वसावे व अमृत मिऱ्या वळवी यांच्यात जागेवरुन वाद झाला. या वादातून भरतसिंग वसावे यांच्या काकाच्या मुलाच्या पत्नीस अमृत मिऱ्या वळवी, जुनिष पोहल्या वसावे, वनसिंग पोहल्या वसावे, भिका पोहल्या वसावे, विजय दातक्या वसावे, धिऱ्या विज्या वसावे, कालूसिंग गुलबा तडवी, फुक्या पोहल्या वसावे, कालूसिंग हुण्या पाडवी, दिनेश कालूसिंग तडवी यांच्यासह 25 जणांनी शिवीगाळ केली.
तसेच भरतसिंग वसावे यांच्या काकाचा मुलगा धनसिंग रुपा वसावे यांची पत्नी कविता धनसिंग वसावे यांच्या नावे असलेल्या बियर शॉपीवर जाऊन पाच ते सात बियरच्या बाटल्या फोडून खुर्ची तोडून नुकसान केले व गल्ल्यातील 70 हजार रुपयांची रोख रक्कम काढून नेली. याबाबत भरतसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात सुमारे 35 जणांविरोधात भादंवि कलम 143, 147, 427, 395, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वाघ करीत आहेत.
तसेच याप्रकरणी नितेश वनसिंग वसावे यांनी परस्पर दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जागेच्या वादातून भरतसिंग नसकरीया वसावे याने नितेश वसावे यांना तुझा काका जुनिष वसावे याला माझ्या मालकीची जागा सोडायला सांग आणि त्याने बांधलेले घर तोडायला सांग, असे सांगितले. यावर नितेश वसावे याने सांगितले की, जागेचा प्रश्न काका जुनिष वसावे यांचा आहे तुम्ही त्यांना जावून सांगा. याचा राग आल्याने राकेश आमश्या वसावे याने नितेश वसावे यांना काठीने डोक्यावर मारुन दुखापत केली. नितेश वसावे यांचा भाऊ प्रकाश हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही आमश्या रुपसिंग वसावे व आकाश धनसिंग वसावे यांनी लाठ्याकाठ्या व हाताबुक्यांनी मारहण केली.
सापा रुपसिंग वसावे, भरतसिंग नसकरीया वसावे, सिपा रुपसिंग वसावे, राकेश आमश्या वसावे, बहादूरसिंग रुपसिंग वसावे, राहूल माणिकराव वसावे, पिंट्या लक्ष्मण वसावे व इतर 25 जणांनी मारहाण व शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच धनसिंग वसावे याने नितेश वसावे यांच्या गळ्यातील साडेतीन लाख रुपये किंमतीची आठ तोळे सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली. याबाबत नितेश वसावे यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात 35 जणांविरोधात भादंवि कलम 14, 147, 395, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वाघ करीत आहेत.








