बोरद l प्रतिनिधी
बोरद वगळता बोरद परिसरामध्ये असणाऱ्या गावांमध्ये गणपती मूर्तीची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या दोन महिन्यापूर्वीच बोरद गावामध्ये विवाहित तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. त्याचबरोबर गेल्या १० दिवसांपूर्वी परत एक विवाहित तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे यावर्षी कुठलेही निर्बंध नसताना बोरद गावामध्ये गावकऱ्यांनी स्वतःवर निर्बंध लादून दोन्ही तरुणांप्रती असलेले प्रेम दाखवत यावर्षी गणपती मूर्तीची स्थापना करण्याबाबत उदासीनता दाखवली आहे. फक्त भट्टी हट्टी वगळता गावात घरगुती गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे.
भट्टी हट्टीच्या आदिवासी तरुणांनी मिळून आपल्या रोजंदारीतून येणाऱ्या पैशातून म्हणजेच प्रत्येकाने शंभर रुपये याप्रमाणे वर्गणी गोळा करत मोठ्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना बोरद ग्रामपंचायत कार्यालया शेजारी केलेली आहे.या मूर्तीची स्थापना करताना त्यांनी कुठल्याही प्रकारचे देखावे वगैरे या ठिकाणी सादर केलेले नाहीत. अगदी साध्या पद्धतीने या मूर्तीची स्थापना केलेली आहे.
त्याचबरोबर माध्यमिक शाळा बोरद येथे दरवर्षी धुमधडाक्यात गणपती मूर्तीची स्थापना करण्यात येत असते. परंतु अगदी साध्या पद्धतीनेच त्यांनीही गणपतीची स्थापना केली आहे.विसर्जन मिरवणूक ही न काढण्याचा निर्णय शाळेच्या वतीने घेण्यात आला आहे.
बोरद परिसराबाबत माहिती प्राप्त केली असता. पोलीस दुरुक्षेत्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार बोरद परिसरात असणाऱ्या गावांपैकी अवघ्या पाच गावातील गणेश मंडळा मार्फत गणपती मूर्ती बसवण्याबाबत विनंती व परवानगी अर्ज सादर केलेला होता. त्यापैकी पाचही अर्जांना या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली. आहे.यामुळे बोरद परिसरात असणाऱ्या खरवड, लाखापुर, तुळजा,मालदा,कर्डे, तऱ्हावद या गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी देशात कोरोनाने हाहाकार माजविल्याने अनेक धार्मिक उत्सवावर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे खंड न पडू देता सर्वत्र देशात गणपती मूर्तीची स्थापना करण्यात आली होती परंतु पाहिजे तेवढा उत्साह नव्हता. दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी शासनाकडून कुठल्याही प्रकारचे निर्बंध लादण्यात आले नाहीत त्यामुळे सर्वत्र गणपती मूर्ती स्थापनेबाबत चैतन्याचे वातावरण परिसरात आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून गणेश भक्तांमध्ये दांडगा उत्साह निर्माण झालेला आहे. जिकडे पाहावे तिकडे ढोल ताशांच्या गजराने अवघा परिसर दुमदुमून निघाला आहे.








