नंदुरबार l
गणेशोत्सव तसेच लवकरच येत असलेल्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमवर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन शिवसेना महानगरप्रमुख पंडीत माळी यांनी नंदुरबार नगरपालिकाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तत्काळ कारवाई न झाल्यास शिवसेनातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने त्यात पाणी साचुन डबके तयार होवुन तेथे डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शहरातील नागरिकांना डेंग्यु, मलेरिया, हिवताप, चिकनगुणियासारख्या गंभीर आजारांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच नंदुरबार शहरातील रस्त्यावरील खड्डे तसेच माळीवाडा ते कसाईवाडा परिसरातील ड्रेनेज वरील झाकण उघडे असल्यामुळे, मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे अपघात होवुन जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या गणेशोत्सवाचा काळ असून सर्व व्यायामशाळेच्या मिरवणूका या शहरातील महत्वाच्या रस्त्यावरुन जाणार असल्यामुळे सदर रस्ते हे तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत. तसेच येत्या काही दिवसांत हिंदु धर्मियांचे नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आदी महत्वाचे सण-उत्सव असल्यामुळे शहरातील सोनार गल्ली, फडके चौक, घोडापिर चार रस्ता, चिराग गल्ली येथे ड्रेनेज भरुन कायम सांडपाणी रस्त्यावरुन वाहत असते. तसेच भररस्त्यावर बंद पडलेल्या भंगार गाड्या, खडी, रेती, विटा, जुन्या बंद पडलेल्या गाड्या, भंगाराची दुकाने ही गणशोत्सव मिरवणूकीच्या मार्गावरुन तात्काळ हटविणेबाबत आपण संबंधित यंत्रणेला आदेश करावेत.
नंदुरबार पालिकेच्या अधिपत्याखालील इलेक्ट्रिक पोलवरील पथदिवे हे मागील अनेक वर्षांपासून बंद असून ते देखील तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत अन्यथा शिवसेनेतर्फे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणार्या विपरीत परिणामास सर्वस्वी नपा प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर महानगर प्रमुख पंडीत माळी, शहर प्रमुख राजधर माळी, युवा सेना जिल्हा अधिकारी अर्जुन मराठे, युवा सेना उपजिल्हा अधिकारी सागर पाटील, युवा सेनेचे शहर अधिकारी दादा कोळी यांच्या सह्या आहेत.








