नंदुरबार प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात विविध विभागांतर्गत आधीच मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यातच काही कर्मचारी अतिदुर्गम-दुर्गम भागात असतांना कर्तव्यात कसूर करत असल्याचे आढळले आहे. यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी ‘हजेरी’ ॲपची निर्मिती करण्यात आली असून या माध्यमातून त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. यात कामचुकार आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सुरुवातीला वेतन रोखले जाणार असून तरीही सुधारणा न झाल्यास निलंबन करण्याचा इशारा आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी मंत्री डॉ.गावित म्हणाले, नवसंजिवनी योजनेच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती देण्यासाठी आढावा घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. डोंगराळ भागात रस्ते तसेच मोबाईल नेटवर्कची कनेक्टीव्हीटी नसल्याने अडचणी येत आहेत.
मात्र येत्या काळात सदरच्या अडचणी सोडविण्यात येणार आहे. खा.डॉ.हीना गावित यांनी मोठ्या प्रमाणावर मोबाईल टॉवर मंजूर करुन घेतल्याने नेटवर्कची समस्या सुटणार असल्याचे मंत्री डॉ.गावित म्हणाले. यापुढे ते म्हणाले, जिल्ह्यातील विविध विभागात पदे रिक्त असून ती भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यातच दुर्गम-अतिदुर्गम भागात कार्यरत काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नाहीत.
यामुळे त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी ‘हजेरी’ ॲप तयार करण्यात आले असून या माध्यमातून मॉनिटरींग केली जाणार आहे. वेळेवर कार्यालयात उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार रोखण्याची कारवाई केली जाणार आहे. मात्र तरीही यात सुधारणा न झाल्यास थेट निलंबन केले जाणार आहे. नुकतीच काही भागांमध्ये भेटी दिल्या असता कर्मचारी आढळून आले नाहीत. यामुळे असे कामचुकार कर्मचाऱ्यांना सदर ॲपच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे. जिल्ह्यात सर्वत्र बायोमॅट्रीक बसविणार असल्याचेही डॉ.गावित यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचेही मंत्री डॉ.गावित यांनी सांगितले.








