नंदुरबार l
आयुर्वेदिक शिबिराचे नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदाच शिबिर होत आहे. प्रत्येकाची वैद्यकीय पॅथी वेगवेगळी असते. या पॅथींचा चांगल्या पध्दतीने उपयोग व्हावा. प्रत्येक पॅथीला मान्यता देण्यासाठी मंडळाची स्थापना करुन दिली आहे. यातून वेगवेगळे कोर्स उपलब्ध निर्माण होवुन योग्य उपचार पध्दतीचे कोर्सेस करता येतील. आयुर्वेदिकमधील उपचार पध्दती चांगल्या प्रकारे लाभदायक ठरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारमध्ये आयुर्वेदाच्या आयुष मंत्रालयाची स्थापना केली. आयुर्वेदिकमधील उपचार हे आजही दुर्मिळ आहेत. आजच्या परिस्थितीत जंगलांचे र्हास होवुन लागले असल्याने दुर्मिळ आयुर्वेदिक औषधींचा नागरीकांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचा नागरीकांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.
नंदुरबार येथील पारेश्वर मेडिकलच्या शुभारंभानिमित्त गुरुजी आयुर्वेद नाशिक यांच्या वतीने प.पु.पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा व उपचार शिबिराचा शुभारंभ झाला. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित, खा.डॉ.हिना गावित, भागवताचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा व उपचार शिबिराचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, नंताविसचे व्हा.चेअरमन मनोज रघुवंशी, ऑल इंडिया न्यूज पेपर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यभान राजपूत, महेंद्रसिंग रघुवंशी, शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष चंद्रभान राजपूत, डॉ.शिरीष दाणी, गुरुजी आयुर्वेदचे अमोल दायमा, नगरसेवक अॅड.चारुदत्त कळवणकर, मोहन खानवाणी अखिलेश भगरे, रवि जोशी, डॉ.अनिता अग्रवाल, डॉ.सचिन अग्रवाल आदी उपस्थित होते.
या शिबिरात खा.डॉ.हिना गावित म्हणाल्या की, आयुर्वेदाची सुरुवात ही भारतातून झाली असून आज जगातील अनेक देश हे अॅलोपॅथीकडून आता आयुर्वेदाकडे येत आहेत. केंद्र सरकामधील आयुष्य मंत्रालय हे भारतातच नव्हे तर परदेशात देखील वेगवेगळे आयुर्वेदाचे विविध उपचार कार्यक्रम होत आहेत. अनेक लोकांचा कल आयुर्वेदाकडे वाढु लागला आहे. सातपुडा पर्वत रांगांमध्ये अनेक आयुर्वेदिक औषधींचे झाडे आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात वनभाजीपाला महोत्सव होत असून सातपुड्यातील विविध प्रकारच्या हिरव्या वन पालेभाज्य प्रदर्शनातून दिसून येतात. सातपुड्यातील लोक वन पालेभाज्यांचा आहार घेत असल्याने त्यांची रोगप्रतिकार शक्ती अतिशय चांगली असते. आहारातील अनेक पालेभाज्या या आजारांवर उपचारासाठी लाभदायक ठरत असतात. पालेभाज्या व वन औषधींचे महत्त्व अनेकांना माहिती नाही. आयुर्वेद उपचारासाठी उशिर लागत असला तरी, त्याचा फायदा मात्र चांगला होत असतो. केंद्र सरकारकडून नंदुरबार येथे शंभर बेडचे आयुषचे रुग्णालय मंजूर झाले असून रुग्णालय इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले आहेत.
नंदुरबारातील आयुष रुग्णालयाचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल. या आयुष रुग्णालयामध्ये आयुर्वेदिक, युनानी, होमीओपॅथी, सिध्दा असे सर्व उपचार आता आयुष रुग्णालयातून एका छताखाली होणार असल्याचे खा.डॉ.हिना गावित यांनी सांगितले. यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की, प्रत्येक माणुस काही अंशी आजारी आहेत. आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिनचर्या पाळणे आवश्यक आहे. दिनचर्या पाळल्यास आरोग्य सुदृढ राहिल. आयुर्वेदिकचे उपचार गुण उशिरा लागत असले तरी, त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. आयुर्वेदिकमुळे नुकसान होत नाही. चांगली प्रकृतीसाठी प्रत्येक व्यक्तीने नियमित व्यायाम व आयुर्वेद गुरुजींच्या मार्गदर्शनाने औषध घेतल्यास आपले आरोग्य चांगले राहील, असेही ते म्हणाले.
भागवताचार्य पंडीत अतुलशास्त्री भगरे गुरुजी म्हणाले की, मध्यंतरी संपुर्ण जगाला घाबरवुन सोडणारा कोरोना विषाणुने आपल्यातील अनेकांना हिरावुन नेले. दीड ते दोन वर्ष लॉकडाऊनमध्ये सर्वांना घरात रहावे लागले व सर्व व्यवहार बंद झाले. हे सर्व निसर्गावर मात करण्याच्या उद्देशाने जे काही करतो, तो निसर्गच कोणत्या ना कोणत्या उद्देशाने आपल्याला अडचणीचा ठरु शकेल. म्हणुन आपणच निसर्गाच्या सानिध्यात असणे आवश्यक आहे. आयुर्वेद हा ऋषी मुनींपासुन झालेला आहे. ज्यावेळी ब्रह्मदेवाने मानवी सृष्टी तयार केली, तेव्हा या सृष्टीसाठी खानपानापासून काय निर्माण व्हावे, याकरीता सर्व वनस्पती निर्माण केल्या. या सृष्टीमध्ये लाखोंच्या संख्येने वनस्पती असून त्या वनस्पतींचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. वनस्पतींच्या माध्यमातून निसर्गाच्या सानिध्यातून आयुर्वेदाची निर्मिती झाली. याच आयुर्वेदाच्या माध्यमातून गुरुजी आयुर्वेद नावाची कंपनी स्थापन करण्यात आली आहे. तीन डॉक्टरांचे पॅनल हे विविध व्याधींवरील औषध निर्मितींवर चर्चा केली आणि त्यातून 48 पेक्षा जास्त औषधींची निर्मिती झाली आहे.
शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी अतुल्य संजीवनी ही आयुर्वेद औषध तयार केली असून ही औषध कुठलीही व्याधी शरीरात येवु देत नाही, याचा फायदा होत असतो. देश, राष्ट्र व समाज हे निरोगी व स्वस्थ रहावी, अशी अपेक्षा गुरुजींनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रणजीत राजपूत यांनी केले. आभार चेतनसिंग राजपूत यांनी मानले.
प.पू.भगरे गुरुजींचे आज कथा प्रवचन
मोफत आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा व उपचार शिबिरानिमित्त पंडीत अतुलशास्त्री भगरे गुरुजी हे नंदनगरीत मुक्कामी आहेत. उपचारासाठी आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार आहे. या चिकित्सा शिबिराचा समारोप भागवताचार्य पंडीत अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या कथा प्रवचनानाने होणार आहे. आज दि.30 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता नंदुरबार येथील शिबिरस्थळी पंडीत अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचे कथा प्रवचन होईल.








