नंदुरबार । प्रतिनिधी
मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे गाव शिवारात भरधाव अरर्टीगा कार उलटून झालेल्या अपघात तीन तरूण जागीच ठार झाले आहेत. तर पाच तरूण जबर जखमी झाले आहेत. सर्वजण कन्नडसह (जि. औरंगाबाद) परिसरातील आहेत. आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमीना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कन्नड आणि परिसरातील आठ जण ( एमएच .22, यू. 7128) क्रमांकाच्या कारने धुळ्याकडून शिरपूरच्या दिशेने जात होते. पहाटे दीड वाजेच्या सुमारास धुळे- शिरपूर रस्त्यावर बाभळे गावाच्या शिवारात जलशुध्दीकरण केंद्राजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. या अपघातात पवन किरण जाधव (वय 24), सचिन सुभाष राठोड (वय 24) आणि गणेश भगवान हिरे (वय 28) हे तिघे जागीच ठार झाले. तर सागर समाधान पाटील, नवनाथ आबा बोरसे, शिवाजी जग्गु जाधव, किशोर आसाराम राठोड, गोरख कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिकांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर धुळ्यातील हिरे शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शिरपुर विभागाचे डीवायएसपी माने, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड, पीएसआय गजानन गोटे , एसएसआय पठाण, पोकाँ सुशिलकुमार गांगुर्डे, विनोद सोनवणे, प्रभाकर सोनवणे, माळी आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. शिंदखेडा पोलिसात उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.