नंदुरबार l
महिलांच्या सुरक्षेसाठी शिवाय त्यांना हक्क मिळवून देण्यासाठीही कायद्यात आवश्यकतेनुसार योग्य तरतूद करण्यात आली आहे. आपापली सुरक्षा व आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी महिलांनी कायदा जाणून घ्यावा असे आवाहन जिल्हा न्यायाधीश आर.जी.मलशेट्टी यांनी धडगाव येथील महिला विधी सेवा जागृकता शिबीरात केले.
सेवेला जीवन समर्पित करणाऱ्या शांतीदूत तथा भारतरत्न मदर तेरेसा यांच्या जन्मदिनानिमित्त नंदुरबार जिल्हा व धडगाव तालुका विधी सेवा प्राधिकरणतर्फे धडगावात महिला विधी सेवा जागृकता शिबीर घेण्यात आले. शिबीरात जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आर.जी. मलशेट्टी, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश आर.एन.गायकवाड, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस.टी.मलिये, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.डी.व्ही.हर्ने, तालुका विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा न्यायाधिश डी.जी.कंखरे,
तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.के.पी.वळवी, ॲड.शारदा पवार, ॲड.सीमा खत्री यांच्यासह विविध प्रशासकीय विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान पोलीस प्रशासन, महिला बाल विकास, मानव विकास मिशन, तहसील, पंचायत समिती व अन्य विविध विभागांच्या प्रतिनिधींनी आपापल्या विभागामार्फत महिलांना दिल्या जाणाऱ्या योजना व हक्कांची माहिती दिली. तर कायद्याने महिलांना दिलेले हक्क व सुरक्षेबाबत बोलताना न्या.मलशेट्टी यांनी बालविवाह रोखण्यासाठी केवळ मुलींच्या आई-वडीलांनीच नव्हे मुलांकडूनही काळजी घेतली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
न्या. हर्ने यांनी भारतरत्न मदर तेरेसा यांच्या कार्याचा आढावा घेत प्रत्येकाने आपापल्या परीने सामाजिक योगदान द्यावे असे आवाहन केले. महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना न्या.हर्ने यांनी पिडीत महिलांसाठी विधी सेवा प्राधिकरणने स्वतंत्र तरतूद केली असून आर्थिक, युक्तिवाद व अन्य सहकार्य केले जाते. त्याची सर्व माहिती विधी सेवा प्राधिकरणकडून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील यांनी केले.
गृहिणींचा उत्सवाचा अर्धत्याग:-
वर्षभर शेतीकामात इमान इतबारे राबणाऱ्या सर्जा राजाला दोन घास गोडधोड खाऊ घालण्यासाठी गृहिणी बैलपोळ्याल पुरणपोळी बनवण्यात मग्न असतात, सहपरिवार उत्सव साजरी करतात. परंतु यंदा धडगाव तालुक्यातील बहुतांश गृहिणी बैलपोळा हा उत्सव पूर्णपणे साजरी न करता महिलांविषयी कायदा, हक्क व योजना जाणून घेण्यासाठी ‘महिला विधी सेवा जागृकता’ शिबिराला उपस्थित राहिल्या.
शिबिरातून तेरेसांच्या कार्याचा गौरव:-
थोर समाजसेवीका भारतरत्न मदर तेरेसा यांनी निस्वार्थपणे गरिब, बिमार, असहाय्य आणि गरजवंतांना मदत केली. खरं तर त्या स्वतःसाठी नव्हें इतरांसाठी जगल्या. त्याच्या जन्मदिनानिमित्त न्या. कंखरे यांनी महिलांसाठी विधी सेवा जागृकता शिबीर घडवून आणले. यासाठी कंखरे यांना नंदुरबार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धडगाव विधी सेवा प्राधिकरण व वकिल संघ धडगाव यांचे पाठबळ मिळाले. या शिबिरातूनच मदर तेरेसा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हीच बाब त्यांच्या कार्याच्या गौरवाशीही ठरली.








