नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील कामोद येथे भिंतीवर डोके आदळून जीवे ठार मारणाऱ्यास विसरवाडी पोलीसांनी अटक करीत खुनाचा पर्दाफाश केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 16 जुलै रोजी रात्री उशीरा कामोद गावाचे लगत असलेल्या वन विभागाच्या हद्दीत एका अनोळखी पुरुष जातीचे प्रेत पडलेले असल्याची बातमी विसरवाडी पोलीसांना प्राप्त झाली होती . त्यावरुन विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा . पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील व नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना कळविले होते .
घटनेचे गांभीर्य ओळखून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर . पाटील यांनी विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा . पोलीस निरीक्षक नितीन पाटील व नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना घटनास्थळी भेट देवून अनोळखी मयताची ओळख पटवून तसेच त्याच्या मृत्युच्या कारणांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते . त्यावरुन विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती . अकस्मात मृत्युची चौकशी सहा . पोलीस उप निरीक्षक दिलीप मौल्या गावीत हे करीत होते . चौकशी दरम्यान
कामोद ता . नवापूर येथील दासु बाबा गावीत यास विचारपूस केली असता दासु गावीत यांचा लहान भाऊ दिलीप बाबा गावीत हा दिनांक 11 जुलै रोजी सकाळी त्यांच्या राहत्या गावातून आंबे विक्री करण्यासाठी खोकसा , कोटखांब ता . नवापूर येथे गेले होते , परंतु ते घरी आले नाहीत म्हणून दासु गावीत यांनी प्रेत मिळाल्यानंतर विसरवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मिळालेले प्रेत हे त्यांचा भाऊ दिलीप गावीत यांचे असल्याचे ओळखले होते .
प्रेताच्या उत्तरीय तपासणीत वैद्यकीय अधिकारी यांनी मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू असा अभिप्राय दिल्याने मयत दिलीप बाबा गावीत याचा मृत्यू हा नैसर्गिक नसून घातपात असल्याचा संशय बळावला होता . तसेच त्याचा खून करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतून मयताचे प्रेत जंगलात फेकून दिल्याचे निदर्शनास आले होते . त्यावरून विसरवाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302,201 प्रमाणे दि.25 ऑगस्ट 2022 रोजी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . मयताचा खून करण्याचा उद्देश काय ? व खून कोणी केला ? याचा शोध घेणे असे आव्हान पोलीसांसमोर होते .
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी घटनेचा आढावा घेवून विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे पथक तयार करुन आरोपी तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले . मयत दिलीप बाबा गावीत हा दि.11 जुलै 2022 रोजी रात्री संशयीत आरोपी रविंद्र धिरजी गावीत रा . कामोद ता . नवापूर याच्या घरी दारु पीत होता अशी गुप्त बातमी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर . पाटील यांना मिळाली . त्यावरून त्यांनी संशयीत आरोपी रविंद्र धिरजी गावीत यास ताब्यात घेण्याचे आदेश विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना दिले .
संशयीत आरोपी रविंद्र धिरजी गावीत यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता 11 जुलै 2022 रोजी मयतासोबत दारु पीत असतांना संशयीत आरोपी रविंद्र गावीत याच्या पत्नीचे व मयत दिलीप गावीत यांचे अनैतिक संबंध आहेत या कारणावरून संशयीत आरोपी रविंद्र गावीत व मयत दिलीप गावीत यांच्यात वाद झाला . त्यादरम्यान रविंद्र गावीत याने मयत दिलीप गावीत याचे डोके भिंतीवर आदळून त्याचा खून केल्याची कबुली व प्रेत कामोद गावालगत असलेल्या वन विभागाच्या परिसरात फेकून दिल्याची कबुली संशयीत आरोपी रविंद्र धिरजी गावीत याने दिली .
ताब्यात घेण्यात आलेला संशयीत आरोपी रविंद्र धिरजी गावीत रा . कामोद ता . नवापूर यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी विसरवाडी पोलीसांनी अटक केली आहे . सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी. आर . पाटील , उप विभागीय पोलीस अधीकारी , नंदुरबार सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक नितीन पाटील , पोलीस उप निरीक्षक भुषण बैसाणे , सहा . पोलीस उप निरीक्षक दिलीप गावीत , पोलीस नाईक अनिल राठोड यांच्या पथकाने केली आहे .








