नंदुरबार l प्रतिनिधी
आज आपण तासभर प्राणवायू विकत देणाऱ्या वैद्यकांना देव मानतो, तसे एक पाऊल पुढे जाऊन आयुष्यभर मोफत प्राणवायू देणाऱ्या झाडांबाबतही आपण ऋणात असले पाहिजे. खरं तर झाड हे स्वयंपोषीत असून ते विविध मार्गाने परपोषीत जिवांचे जीवन फुलवते. अशा या परोपकारी झाडांची लागवड करीत नैसर्गिक चैतन्य निर्माण करा असे आवाहन माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांनी केले.
मातृसत्ताक आदिवासी समाजातील महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक कामात योगदान देत आल्यात, वृक्षलागवडीतही त्या मागे राहिल्या नाही. महिलांची ही पर्यावरण रक्षण व संवर्धनातील भूमिका लक्षात घेत धडगावात अक्काराणी लोकसंचलित साधन केंद्राच्या सभेनिमीत्त सातपुडा ग्रीन व्हॅली ॲग्रीकल्चर प्रोड्युसर कंपनीतर्फे ६० हजार रोप वाटप करण्यात आले. यावेळी माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहनियंत्रण अधिकारी मिलींद पाटील, वाण्या वळवी, रमेश वसावे, सातपुडा ग्रीन व्हॅली ॲग्रीकल्चर प्रोड्युसर कंपनीच्या निशाताई वळवी, आयसीआयसीआय बँकेचे बोरसे, अक्काराणी सीएमआरसीच्या मॅनेजर सुरेखा तडवी, अध्यक्षा सुरजाबाई वसावे, सचिव जमुना पावरा, तोरणा सीएमआरसीच्या रमिला वसावे, खात्रीबाई वळवी, अशा वळवी, कविता वळवी, रमकबाई पावरा, जानू वळवी, सिता पाडवी, बामणीबाई वळवी आदी उपस्थित होते. यावेळी ढासळत्या पर्यावरणाबाबत चिंता व्यक्त करतांना वाण्या वळवी यांनी सातपुड्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी कुठलीही पर्वा न करता झटणारे ॲड. वळवी हे आपण सर्वांचे काळजीवाहू बंधू असल्याचे म्हटले. कार्यक्रमांसाठी निलीषा पाडवी, सेवी पावरा, लता पवार, कल्पेश पावरा यांनी परिश्रम घेतले.
अन्नापेक्षा पाणी महाग होईल:-
वृक्षलागवड अभावी निर्माण झालेल्या पाण्याच्या दुर्भिक्षबाबत चिंता व्यक्त करतांना माजी मंत्री ॲड. वळवी यांनी सातपुड्यात मुबलक पाण्यासाठी वृक्षलागवडीची नितांत आवश्यकता असल्याचे म्हटले. सातपुड्यातील बहुतांश कुपनलिकांना पाणीच लागत नाही, हे भविष्यातील महासंकटाचे लक्षण असल्याचे पटवून देतांना जंगलच राहिला नसल्याने सातपुड्यातील पावसाचे पाणी तापी-नर्मदेत जात आहे. पुढे अन्नापेक्षा पाणी काही पटीने महाग होईल, ही बाब रोखण्यासाठी झाडे लावा – झाडे जगवा उपक्रम राबवण्याचे आवाहन ॲड.वळवी यांनी केले.
निरर्थक ठरतील पाणीपुरवठा योजना:-
वृक्षलागवड केलीच नाही तर पावसाचे पाणी अडवता येणार नाही. विहिरी कोरड्या पडतील, कुपनलिका बंद पडतील. भूतलावर पाणीच राहणार नाही तर शासनाच्या पाणीपुरवठा योजनांना कुठलाही अर्थ राहणार नाही. यासाठी वृक्षलागवडीत भर टाकणे काळाची गरज आहे. वृक्षलागवडीमुळे केवळ पाणी नव्हे तर जमिनीची धूप थांबेल, प्राणवायू मिळेल अन् पर्यावरणाचा समतोलही साधला जाईल, असेही ॲड.वळवी यांनी सांगितले.
हरित क्रांतीसाठी सातपुडा ग्रीन व्हॅली:-
मोदलपाडा ता. तळोदा येथील सातपुडा ग्रीन व्हॅली ॲग्रीकल्चर प्रोड्युसर कंपनीतर्फे आजपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात १० कोटी वृक्षलागवड करण्यात आली. या वर्षी किमान एक कोटींचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या या कंपनीने तीन महिन्यात 15 लाख बांबू व इतर रोपे वाटप केली असून 20 लाख बांबूची रोपे अजून वाटप केले जाणार आहे. दरवेळेस योजनांची नावे बदलत शासनामार्फत वृक्षलागवड केली जात असली तरी ओसाड रानाची अवस्था मात्र बदलत नाही. अशा स्थितीत सातपुडा ग्रीन व्हॅलीने तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्याचा बहुतांश भाग वनाखाली आणत पर्यावरण ढासळू दिले नाही, ही बाब हरित क्रांतीला द्योतक ठरत आहे.