तळोदा । प्रतिनिधी
तळोदा येथील जामा मस्जिद ट्रस्टच्या अंतर्गत वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली .यात चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागल्याची घटना काल (दि.19) सायंकाळी प्रशासकीय इमारतीच्या आवारात घडली.
तळोदे येथील जामा मशिद ट्रस्टच्या दोन गटात काही काळापासून वाद सुरू होता. याबाबत शुक्रवारी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांच्या उपस्थितीत दोन्ही गटातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी बैठक घेण्यात आली. यापुढे वाद होणार नाही यावर एकमत झाले. दोन्ही गटातील सदस्यांनी एकमेकांना आलिंगन दिले. मात्र दोन्ही गट पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर पडल्यानंतर प्रशासकीय इमारतीच्या समोर असणाऱ्या आवारात त्यांच्या आपआपसामध्ये शाब्दिक चकमक शिगेला पोहचली .
दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. दगड व मारा करण्यात आला. या हाणामारी चार जण जखमी झाले आहेत. गोकुळाष्टमीनिमित्त शहरातील पोलिसांचे संचलन होत असताना हाणामारीची घटना घडली. यावेळी पोलीस निरीक्षक, एक पोलीस कर्मचारी, दोन गृह रक्षक दलाचे जवान यांनी जमावाला शांत केले. घटना घडल्यानंतर तात्काळ संचालनात असलेल्या पोलिसांनी तळोदा प्रशासकीय इमारतीच्या आवारात धाव घेतली. जमावाला पांगविण्यासाठी सोम्य लाठीचार्ज करावा लागला. घटनास्थळी अक्कलकुवा
येथील उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेत जाहीर शेख रउफ शेख (वय 32), आकीब शेख आरिफ शेख (वय 23), शेरखान अजिज खान पठाण (39), तनवीर शेख शरीफ, आरिफ शेख नुहरा (48) हे जखमी झाले आहेत.