नवापूर | प्रतिनिधी
तालुक्यातील बेडकीपाडा गावाच्या शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत ६४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात चार महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत गुजरात व महाराष्ट्र राज्यातील हायप्रोफाईल पुरूष व महिलांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा शिवारात १८ऑगस्ट रोजी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास सुरज जयस्वाल यांच्या पत्र्याच्या बंदीस्त शेडमध्ये रईस रशीद शेख (वय ३२, नवापुर मुळ मालक) व इतर ६४ जण अवैधरित्या झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळतांना आढळून आले. त्याच्याकडून ७ लाख ५३ हजार ४० रुपये रोख, चार ५२ पत्यांची कॅट, ५८ हजार रुपये किंमतीचे ९ मोबाइल फोन, २७ लाख ५० हजार रूपये किंमतीचा ०८ चारचाकी वाहने असा एकुण ३५ लाख ६१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक मोकळ, पो हे कॉ दिनेश वसुले करीत आहे. या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.








