नंदुरबार l प्रतिनिधी
येथे शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील वावद ते वैंदाणे परिसरातील विद्यार्थ्यांची संख्या अधिकची असल्याने त्यामुळे आगारातून सायंकाळी ५.३० वाजता नंदुरबार- वैंदाणे पर्यंत आणखीन एक बस सुरू करावी , अशी मागणी रजाळेसह परिसरातून विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे. येत्या ८ दिवसात बस सुरू न झाल्यास पालकांसह विद्यार्थी तीव्र आंदोलन करतील असाही इशारा देण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील रजाळेसह बलवंड , ढंढाणे, सैताणे, खर्दे, तलवाडे , वैंदाणे परिसरातील येथील विद्यार्थी- विद्यार्थीनी शिक्षणासाठी नंदुरबार येथे येतात. परिसरातून विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने त्यामुळे आगार प्रमुखांनी एक बस अधिकने सुरू करावी. कारण शाळा सुटल्यानंतर नंदुरबार येथून वेळेवर बस मिळत नसल्याने बसस्थानकातच उभे राहावे लागते तसेच तासन् तास उभे राहूनही एकमेव नंदुरबार वैंदाणे ही बस ६.३० वाजेला असते.
त्या बस मध्येही जागा अभावी अनेक विद्यार्थ्यांना बस स्थानकातच राहावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी येण्यासाठी रात्रीचे ८ वाजत असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे यामध्ये विद्यार्थिनींची ही संख्या जास्त असल्यामुळे अधिकही चिंता पालकांना लागत आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार आगार प्रमुखांनी नंदुरबार ते वैंदाणे ही बस स्पेशल विद्यार्थ्यांसाठी सुरू करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सदर बस ही येत्या आठ दिवसात सुरु न झाल्यास परिसरातील पालक व विद्यार्थी आणि ग्रामस्थ बस गावातून येऊ देणार नाहीत असा पवित्रा घेतला आहे.
पालकांची तीव्र नाराजी
बस अभावी विद्यार्थी-विद्यार्थीनी रात्री ८ वाजेला उशिरापर्यंत येत असल्याने रजाळे येथील अनेक पालकांनी आगार प्रशासन व शालेय प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.








