नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती डी आर हायस्कूल मध्ये पर्यावरण पूरक शाडूमातीची गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
त्यात कलाशिक्षक देवेंद्र कुलकर्णी यांनी प्रथमतः विद्यार्थ्यांना शाडू मातीचे महत्त्व,तसेच पर्यावरण पूरक गणेशमूर्तीत झाडांची बी टाकून, नैसर्गिक रंग देऊन त्या मूर्तीचे विसर्जन आपल्याच घरी एका बादलीत किंवा जमिनीत कशी विसर्जित करावी?याबद्दलची शास्त्रोक्त माहिती दिली.तदनंतर विद्यार्थ्यांना शाडू मातीचे गणपती बनवण्याचे प्रात्यक्षिक सादर करून दाखविले.तर काही विद्यार्थ्यांनी सूचनेप्रमाणे प्रात्यक्षिकातून मूर्ती तयार केल्या.

मुख्याध्यापक नारायण भदाणे यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी, प्रदूषण टाळण्यासाठी आपले योगदान व कर्तव्य यांची जाणीव करून दिली.
प्रवेक्षक पंकज पाठक यांनी पीओपीच्या मूर्तीमुळे होणारे प्रदूषण व त्या मुर्त्या पाण्यात बऱ्याच काळापर्यंत विरघळत नाही व संपूर्ण निर्माल्य सुद्धा त्या नदीत टाकले जातात त्यामुळे जलप्रदूषण होत असतो. हे होऊ नये म्हणून इको फ्रेंडली गणेश मूर्ती या वर्षापासून स्थापित करावी अशी महत्वपूर्ण माहिती दिली.
सदर कार्यशाळेत मंचावर शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे, उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी पर्यवेक्षक पंकज पाठक, क्रीडा शिक्षक जगदीश बच्छाव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.








