तळोदा l प्रतिनिधी
येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून हुतात्मा स्मारका जवळ सामूहिक राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात आले होते.
तळोदा शहरात शासनाकडून तालुक्यातील स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी कारावास भोगला व आपले जीवन स्वातंत्र्यासाठी अर्पण केले. अशा ११ स्वातंत्रता सेनानी यांच्या स्मरणार्थ, शहिदांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक मुख्य बाजारपेठेत व प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकात उभारण्यात आले आहे.
या स्मारकावरील शिलालेखावर तळोदा तालुक्यातील स्वातंत्र्य संग्रामात कठोर कारावाच भोगणाऱ्या ११ स्वातंत्र्य सैनिकांचे नावे करण्यात आली आहेत.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनी तळोद्यातील हुतात्मा स्मारक व स्वातंत्र सैनिकांचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला विसर पडला होता.
तरी याबाबत तळोदा येथील स्वातंत्र्य सैनिक भगवान गोविंद शेंडे यांचे वंशज(नातू) उल्हास मगरे यांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी याबाबत म्हटले होते की, पालिकेने १५ ऑगस्ट २०२२ पूर्वी चार दिवस आधीपासून हुतात्मा स्मारकाची रंगरंगोटी केली परंतु पालिका प्रशासन व पालिकेचे लोकप्रतिनिधी तसेच याच मार्गावरून प्रशासकीय इमारतीत जाणाऱ्या सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी या दिवशीच पाठ फिरवली किंवा हे वरीलपैकी कोणालाही स्वातंत्र्य सेनानी यांची साधी आठवण सुद्धा आली नाही. याबाबतीत त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळोदेच्या वतीने आज शासकीय परिपत्रकानुसार हुतात्मा स्मारक तळोदा येथे सामूहिक राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजनामध्ये नगरपालिकेचे बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय तसेच नगरसेविका अनिता परदेशी, युवा नेते संदीप परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष आरिफ शेख नुरा त्याचबरोबर अल्पसंख्यांक सेलचे याकूब पिंजारी, खजिनदार धर्मराज पवार, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळोदा गणेश पाडवी, नदीम बागवान, गणेश राणे, शहर युवक उपाध्यक्ष देवेश मगरे,हितेश राणे आदित्य इंगळे, यश राणे,कुशाल शिरसाठ, नितीन मराठे, प्रकाश पाडवी हे उपस्थित होते.








