नंदुरबार l प्रतिनिधी
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेतंर्गत असंघटीत अन्न प्रक्रीया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक उद्योगांच्या स्पर्धेत वाढ करणे तसेच शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट व उत्पादक सहकारी संस्थांच्या उत्पादनासाठी सर्वकष मूल्यासाखळी विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य करणे. या उद्देशासाठी 15 ते 31 ऑगस्ट, 2022 या कालावधीत जिल्ह्यात कृषि प्रक्रीया उद्योग कर्ज मंजूरी पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजना सन 2020-21 व 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन केले आहे. या योजनेतंर्गत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प किमतीच्या 35 टक्क्यांपर्यंत व जास्तीत जास्त रुपये 10 लाख या मर्यादिपर्यंत प्रति प्रकल्पासाठी अनुदान देय असणार आहे. जिल्ह्यासाठी वैयक्तिक लाभार्थी 197 आणि गट लाभार्थीसाठी 7 असा लक्षांक प्राप्त झालेला आहे.
या पंधरवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांमध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेची माहिती पोहचविली जाणार असून अन्नधान्य आधारीत फळपिके, मसाले पिके उद्योगांचे प्रस्ताव शेतकरी, उद्योजक, व लाभार्थ्यांनी जिल्हा संसाधान व्यक्तींशी संपर्क साधून त्वरीत तयार करावेत. सदर प्रस्तावास पंधरवाड्यात त्वरीत कार्यवाही होऊन कर्ज मंजूरीचे प्रस्ताव संबंधित बँकाकडे पाठविण्यात येतील.
इच्छुक वैयक्तिक शेतकरी, शेतकरी समुह, व्यक्तीं व स्वयं सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी संस्थांनी प्रकल्प उभारणी अर्थ सहाय्यासाठी व योजनेबाबतच्या मार्गदर्शक सूचना व ऑनलाईन अर्ज https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी तालुका कृषि कार्यालय तसेच जिल्हा नोडल अधिकारी संपर्क क्रमांक (9403258703 ) वर संपर्क साधून या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. भागेश्वर यांनी केले आहे.