नंदुरबार | प्रतिनिधी –
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभर हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी आज येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूलतर्फे तिरंगा यात्रा काढण्यात आली. या तिरंगा यात्रेत सायकल, मोटरसायकलसह विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
भारतीय स्वातंत्र्याला त्याग आणि बलिदानाचा मोठा इतिहास लाभला आहे. यातूनच त्याग आणि बलिदानाच्या मुल्यांचा संस्कार येणार्या पिढ्यांवर बिंबावा म्हणून स्वातंत्र्यदिनाचा गौरव सर्वत्र साजरा केला जात आहे. याच स्तुत्य उपक्रमाचा भाग म्हणून आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांनी हर घर तिरंगा उपक्रमाचा प्रचार शुभारंभ केला. स्वातंत्र्य सेनानींनी खेचून आणलेले स्वातंत्र्य जपण्याचा संदेश देत तिरंगा यात्रा काढण्यात आली.
या रॅलीचा शुभारंभ शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जगराम भटकर, संस्थेचे सचिव डॉ.योगेश देसाई, मुख्याध्यापिका सौ. सुषमा शाह यांच्या उपस्थितीत झेंडी दाखवून तिरंगा यात्रेला शुभारंभ करण्यात आला.
शिक्षकांनी फेटे परिधान करून स्वतःच्या दुचाकीवर स्वार होत विद्यार्थ्यांसोबत सायकल रॅलीचे आयोजन केले. पदयात्रेच्या अग्रस्थानी देशभक्तीपर गीत गायन ध्वनिक्षेपकाने करण्यात आले. तसेच विविध देशभक्तीपर घोषणांनी वातावरण मंत्रमुग्ध करण्यात आले.
मोठा मारुती मंदिर, शिवाजी रोड, जळका बाजार, सराफ बाजार, सोनार खुंट, गणपती मंदिर मार्गे यात्रा नेण्यात येवून शहिद स्तंभाला अभिवादन करण्यात आले. नगरपालिका चौकातून पुढे जात श्रॉफ हायस्कूलच्या मैदानावर रॅलीचे विसर्जन झाले.
विद्यार्थ्यांनी हातात तिरंगी झेंडे घेत राष्ट्रभक्तीने ओतप्रोत होत घोषणा दिल्याने वातावरण देशभक्तीमय निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक राजेश शहा, पर्यवेक्षिका सौ.विद्या सिसोदिया, जगदीश पाटील, मुख्याध्यापिका सौ.मिनाक्षी भदाणे, चंद्रकांत सोनवणे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख नरेश शाह व सर्व शालेय परिवाराने मेहनत घेतली.