नंदुरबार ! प्रतिनिधी
तब्बल दिड महिन्यापासून प्रतीक्षेनंतर नंदुरबार , तळोदा , नवापूर , शहादा तालुक्यात मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली . यामुळे मका , कांद्यासह विविध पिकांना जीवदान मिळाले असून , बळीराजा सुखावला आहे . तसेच अक्कलकुवा व धडगावला रिमझिम पाऊस पडला . तर शहादा तालुक्यातील जयनगर येथे वीज तार तुटल्याने शॉक लागून दोन शेळ्या व एक बोकड ठार झाले . दरम्यान दि .१८ ऑगस्टपासून ते २२ ऑगस्टपर्यंत वातावरण ढगाळ राहणार असून पावसाची शक्यता आहे.नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे.
जिल्ह्यात दिड महिन्यापासून प्रतीक्षेनंतर नंदुरबार , तळोदा , नवापूर , शहादा तालुक्यात मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली . जिल्ह्यात २ लाख ८३ हजार ४८० हेक्टर क्षेत्र हे सरासरी पीक क्षेत्र असून , २ लाख ५२ हजार ४१० हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत . जिल्ह्यात ९५ टक्क्याहून अधिक पेरण्या झाल्या आहेत . यात ऊस , मिरची , कापूस हे बागायतीचे पिक धरण्यात आलेले नाही . पाऊस कमी होता. जूनमध्ये सरासरीच्या तुलनेत ४१ टक्के तर ऑगस्टमध्ये यापूर्वी ४०.७ टक्के पाऊस पडला .आज जिल्हाभर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. नंदुरबार शहरात दुपारी तीन वाजेपासून सुरू झालेला पाऊस उशिरापर्यंत सुरूच होता . तळोदा तालुक्यात दोन तास जोरदार पावसाने हजेरी लावली . नवापुरात दोन महिन्यांनी पावसाने हजेरी लावली, नवापूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने विश्रांती घेतली होती . दुपारी तीन वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली . एक ते दीड तास झालेल्या पावसामुळे बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे . शहादा तालुक्यात तब्बल महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने तासभर शहर व तालुक्यात हजेरी लावली. या पावसामुळे काही पिकांना जीवदान मिळणार असले तरी खरीप हंगाम वाया गेल्यातच जमा आहे.
दरम्यान, जयनगर (ता. शहादा)येथे वीज तार तुटल्याने शॉक लागून दोन शेळ्या व एक बोकड ठार झाले. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास शहरासह तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्याने साऱ्यांनीच समाधान व्यक्त केले. तालुक्यात दुबार पेरणी केलेल्या कोवळ्या पिकांना हा पाऊस आधारवड ठरणार आहे. मात्र शेतातून पाण्याच्या टिपूसही बाहेर निघाला नसल्याने नदी-नाले कोरडेठाक आहेत विहिरी व बोरवेल ला पाणी येण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
दरम्यान नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्राकडून कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दि .१८ रोजी ५० मिमी , उद्या दि .१९ रोजी ६९ मिमी , २० रोजी ३३ मिमी , २१ रोजी ७ मिमी तर २२ रोजी १४ मिमी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .