तळोदा l प्रतिनिधी
तळोदा नगरपालिकेने जाहीर केलेल्या शाश्वत विकास आराखड्यावर घेतलेल्या हरकतींवर सुनवाई सुरू करण्यात आली आहे. आज पहिल्या दिवशी 165 जणांनी समितीपुढे आपले म्हणने मांडले. यातील बहुतांश प्रकरणे कृषी वापरवरून रहिवास वापर करण्यासाठीच्या हरकतींची प्रकरणे होती. त्यामुळे त्यांनी समितीपुढे आक्षेप नोंदवले आहेत ही सुनावणी उद्यादेखील सुरू राहणार आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.
तळोदा पालिकेने मे महिन्यात मे महिन्यात शहराच्या शाश्वत विकास आराखडा जाहीर केला होता. या आराखड्यावर तब्बल 317 जणांनी नगरपालिकेकडे हरकती दाखल केल्या होत्या. शेतकर्यांच्या हरकतीप्रकरणी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने सहा सदस्य समिती गठीत करून या समितीने गुरुवारी नगरपालिकेत सुनावणी आयोजित केली होती. या सुनावणीत सकाळी 12 वाजेला सुरुवात करण्यात येऊन सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुनावणी चालली पहिल्या दिवशी 165 जणांनी आपले म्हणणे समितीपुढे मांडले.
या समितीत शासनाच्या नगर रचना विभागाचे सेवानिवृत्त नगररचनाकार अनंत धामणे, शहादा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी प्रा.संजय कुमार दहिवेलकर, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, महिला व बालकल्याण सभापती सूनयना उदासी उपस्थित होते. समितीतील एक सदस्य वैयक्तिक कारणास्तव गैरहजर होते.
दरम्यान, हरकतींवरील सुनावणी उद्या दि.5 रोजी देखील सुरू राहणार असून हरकतींच्या सुनावणीवर समिती काय अहवाल मांडते, याकडे हरकती घेतलेल्या शेतकर्यांचे लक्ष लागून आहे. सुनावणीकामी मुख्याधिकारी सपना वसावा, कार्यालय अधिक्षक राजेंद्र माळी, पालिकेचे नगररचनाकार विनीत काबरा, अनिल माळी यांनी सहकार्य केले.
तळोदा शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर 317 शेतकर्यांनी आक्षेप नोंदवला होता. ही सुनावणी पालिकेने गुरुवारी आयोजित केली होती. तत्पूर्वी या सुनावणी बाबत शेतकर्यांनी गेल्या आठ दिवसापासून जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन साकडे घातले होते. त्यामुळे शेतकर्यांमध्ये सुनावणीबाबत मोठी उत्सुकता लागली होती. परिणामी हरकतीदारांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांनीही तोबागर्दी केली होती. शेतकर्यांच्या या गर्दीने पालिकेला एक प्रकारे यात्रेचे स्वरूप आले होते.